कॅप्टन खरातच्या घरातील झडतीत सापडले शोषणाचे तब्बल १०० व्हिडिओ...

Share:
Main Image
Last updated: 20-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २० मार्च - राजकारण्यांना सत्तेची स्वप्ने दाखवणारा आणि स्वतःला 'कॅप्टन' म्हणवून घेणारा स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्या पापाचा घडा आता पूर्णपणे भरला आहे. एसआयटी (SIT) प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, खरातचे तब्बल १०० हून अधिक अश्लील आणि आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. या कारवाईमुळे राज्यातील राजकीय आणि सेलिब्रिटी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

तपासाचा 'धडाका': दीड तास मॅरेथॉन चौकशी
एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी स्वतः या प्रकरणाची सूत्रे हाती घेतली आहेत. आज त्यांनी तपास अधिकाऱ्यांकडून सुमारे दीड तास सखोल माहिती घेतली. सुरुवातीला ५८ व्हिडिओंची चर्चा होती, मात्र तांत्रिक तपासात हा आकडा १०० च्या पार गेला आहे. हे व्हिडिओ कोणाचे आहेत आणि त्याद्वारे कोणाला ब्लॅकमेल केले जात होते का, याचा तपास आता युद्धपातळीवर सुरू आहे.

घराच्या झडतीत काय सापडले?
नाशिक पोलिसांनी खरातच्या घरावर टाकलेल्या छाप्यात केवळ भोंदूगिरीचे साहित्यच नव्हे, तर गुन्हेगारी कृत्यांचे अनेक पुरावे जप्त केले आहेत:
शस्त्रास्त्रे: एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.
रोकड: ८ लाख रुपयांची रोख रक्कम सापडली आहे.
डिजिटल पुरावे: लॅपटॉप, पेनड्राइव्ह आणि मोबाईल जप्त.
मालमत्ता: मोठ्या प्रमाणावर असलेल्या स्थावर मालमत्तेची कागदपत्रेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

Advertisement

मुख्यमंत्री भेटीमुळे आला होता चर्चेत
सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला अशोक खरात हा निवृत्त कॅप्टन असून त्याने स्वतःची ओळख मोठा अंकशास्त्रज्ञ म्हणून निर्माण केली होती. नोव्हेंबर २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच्या मंदिराला भेट दिल्यानंतर तो प्रकाशझोतात आला होता. याच ओळखीचा फायदा घेत त्याने अनेक बड्या नेत्यांना आणि उद्योजकांना आपल्या जाळ्यात ओढले होते.

३५ वर्षीय महिलेच्या तक्रारीने फुटलं भांडं
एका ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी खरातवर गुन्हा दाखल झाला आणि त्याच्या ढोंगीपणाचा बुरखा फाटला. दैवी शक्ती असल्याचे भासवून त्याने अनेक महिलांचे शोषण केल्याचा संशय आता बळावला आहे. जप्त केलेले १०० व्हिडिओ हे याच शोषणाचे पुरावे असल्याचे बोलले जात आहे.

"तपास अत्यंत गांभीर्याने सुरू आहे. जप्त करण्यात आलेले डिजिटल पुरावे आणि व्हिडिओंची व्याप्ती मोठी आहे. या प्रकरणातील प्रत्येक धागा दोरा तपासला जात असून कोणाचीही गय केली जाणार नाही."
— एसआयटी पथक

Advertisement

Comments

No comments yet.