भोंदू बाबाच्या दरबारात वन्यप्राण्यांच्या अवशेषांचा खेळ? जादूटोणा आणि लैंगिक शोषणाचे नाशिक कनेक्शन उघड...

Share:
Main Image
Last updated: 20-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २० मार्च - स्वतःच्या अंगात दैवी शक्ती आणि मंत्र-तंत्र असल्याचे भासवून असहाय महिलेवर अत्याचार करणाऱ्या भोंदू कॅप्टन अशोक खरात याच्या गैरकृत्यांची व्याप्ती मोठी असून, या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) केली आहे. या संदर्भात ‘अंनिस’च्या शिष्टमंडळाने आज एसआयटी (SIT) प्रमुख तेजस्वी सातपुते यांची भेट घेऊन त्यांना काही अत्यंत गोपनीय माहिती आणि तपासाला दिशा देणारे महत्त्वाचे संपर्क क्रमांक सुपूर्द केले.

वन्यप्राण्यांच्या अवशेषांचा जादूटोण्याासाठी वापर?
कॅप्टन खरात हा भोंदू बाबा धार्मिक विधी आणि जादूटोणा करण्यासाठी वन्यजीवांच्या शरीराचे अवशेष वापरत असल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्याच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये अतिरिक्त कलमे लावण्यात यावीत, अशी मागणी अंनिसने निवेदनाद्वारे केली आहे.

२५ वर्षांपासून शोषणाचे जाळे
अंनिसने निवेदनात म्हटले आहे की, गेल्या २५ वर्षांहून अधिक काळापासून हा भोंदू नाशिकसह राज्य आणि परराज्यातील बड्या व्यक्तींना भविष्य सांगण्याच्या बहाण्याने लुटत होता. नाशिक आणि सिन्नर तालुक्यातील एका गावात ज्योतिष व धार्मिक विधींच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करण्याचे केंद्रच त्याने चालवले होते. यापूर्वीही अंनिसने त्याचा भांडाफोड करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बड्या राजकीय नेत्यांच्या आणि प्रतिष्ठित व्यक्तींच्या पाठबळामुळे तो वाचत गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Advertisement

बड्या हस्तींचे धाबे दणाणले
नोव्हेंबर २०२२ मध्ये महाराष्ट्राचे एक माजी मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी ज्योतिष जाणण्यासाठी खरातकडे गेले होते, त्यावेळीही अंनिसने निषेध नोंदवला होता. आता पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ५८ 'रहस्यमय' व्हिडिओंमुळे अनेक बड्या राजकीय नेत्यांचे आणि हस्तींचे धाबे दणाणले आहेत. या चित्रफितींमध्ये अनेक प्रभावशाली व्यक्ती असण्याची शक्यता असल्याने तपास यंत्रणेवर राजकीय दबाव येण्याची भीतीही अंनिसने व्यक्त केली आहे. तसेच, खरातच्या ट्रस्टमध्ये राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षांचा समावेश असल्याचे समोर येणे ही गंभीर बाब असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

"जादूटोणाविरोधी कायद्यानुसार पोलीस स्टेशन प्रमुखांनी अशा बुवाबाजीला आळा घालणे अपेक्षित असताना, खरातचे प्रकरण पोलिसांच्या दुर्लक्षाकडे बोट दाखवते. आता एसआयटीने सावधगिरीने पीडितांचा शोध घेऊन सर्व पुराव्यांसह या गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळवून द्यावी, जेणेकरून समाजातील भोंदूगिरीला आळा बसेल."
— महाराष्ट्र अंनिस शिष्टमंडळ

या निवेदनावर अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. आशा लांडगे आणि महेंद्र दातरंगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.