सातपूरमध्ये तीन मंदिरांच्या दानपेट्या फोडणारा जेरबंद... सीसीटीव्ही आणि खबऱ्याच्या जाळ्यामुळे... 

Share:
Main Image
Last updated: 21-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १९ मार्च - 'देवही सुरक्षित नाहीत' अशी म्हणण्याची वेळ आता सातपूरवासीयांवर आली आहे. सातपूर परिसरातील तीन प्रसिद्ध मंदिरांच्या दानपेट्या फोडून रोकड लंपास करणाऱ्या अट्टल चोरट्याला जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाला यश आले आहे. रितेश भगवान सुबर (वय १९, रा. काकडमळा, सातपूर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
गेल्या ११ फेब्रुवारी रोजी सातपूर परिसरातील लालबाग राजा गणपती मंदिर, हनुमान मंदिर आणि विनायक मंदिर या तीन मंदिरांना चोरट्यांनी लक्ष केले होते. मध्यरात्रीच्या सुमारास मंदिराच्या दानपेट्या फोडून त्यातील रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली होती. एकाच रात्री तीन मंदिरे फोडल्या गेल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

असा लागला छडा
या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट-२ कडे सोपवण्यात आला होता. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली असता, त्यात दोन संशयित दानपेटी फोडताना स्पष्टपणे दिसून आले. तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण आणि गुलाब सोनार यांना खास खबऱ्याकडून माहिती मिळाली की, संशयित रितेश हा अंबड एमआयडीसीतील फ्रेशअप बेकरीजवळ येणार आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि रितेशला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या साथीदारासह चोरी केल्याची कबुली दिली.

पोलीस पथकाची कामगिरी
ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात प्रभारी सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे, मुक्तारखान पठाण, गुलाब सोनार, शंकर काळे, विलास गांगुर्डे, सुनील आहेर, चंद्रकांत गवळी, वाल्मीक चव्हाण यांचा समावेश होता. पुढील तपासासाठी आरोपीला सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.