नाशिक, (प्रतिनिधी) ४ मार्च - शहरातील आनंदवली आणि ध्रुवनगर परिसरात जुन्या वादाची कुरापत काढून दोन गटांत जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हिंसक घटनेत दोन्ही गटांतील एकूण चार जण जखमी झाले असून, याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना: जिमवरून परतताना अडवून मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, मारहाणीची पहिली घटना ध्रुवनगरमधील रेम्बो स्कूल भागात घडली. फिर्यादी करण बबन शिंदे (२३) हा सोमवारी (दि. २) रात्री आठच्या सुमारास जिममधून घरी परतत होता. यावेळी बापुराव कोळी, त्याचा पुतण्या आणि दोन साथीदारांनी त्याला वाटेत अडवले. करणच्या आईसोबत झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून संशयितांनी त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी करणची आई आणि त्याचा मित्र गणेश भवर वाचवण्यासाठी आले असता, संशयितांनी त्यांनाही मारहाण केली. या घटनेत करण आणि गणेश दोघेही जखमी झाले आहेत.
दुसरी घटना: पोलीस ठाण्यात जाताना गाठून हल्ला
याच वादाच्या पार्श्वभूमीवर दुसरी घटना रात्री दहाच्या सुमारास गुरुजी हॉस्पिटलसमोर घडली. विद्याधन सिताराम कोळी (रा. सिडको) हे विशाल निसाळ आणि गोविंदा या मित्रांसोबत तक्रार देण्यासाठी गंगापूर पोलीस ठाण्यात जात होते. यावेळी श्रावण खरादे, रोहन गायकवाड आणि गणेश भवर यांनी त्यांना रस्त्यात गाठले. संशयितांनी शिवीगाळ करत विद्याधन कोळी आणि विशाल निसाळ यांच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
पोलीस तपास सुरू
आनंदवली आणि गंगापूर रोड परिसरात झालेल्या या सलग दोन हाणामारीच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गंगापूर पोलिसांनी दोन्ही गटांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास पोलीस हवालदार लोंढे व अहिरे करत आहेत.