बँकेने जप्त केलेल्या सदनिकेवर टोळक्याचा 'दरोडा'.... रीतसर सील तोडून बळजबरीने ताबा...

Share:
Last updated: 01-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १ मार्च - शहरातील खुटवडनगर भागात एका बँकेने कायदेशीर मार्गाने जप्त केलेल्या सदनिकेचा (फ्लॅट) काही जणांनी संगनमत करून बळजबरीने ताबा घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सील ठोकलेल्या या सदनिकेचे कुलूप लोखंडी पहारीने तोडून हा प्रताप करण्यात आला असून, याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, बँक ऑफ बडोदाच्या वतीने खुटवडनगर येथील केवलपार्क मधील 'निलांजन अपार्टमेंट'मधील सदनिका क्रमांक २१ वर गृहकर्ज देण्यात आले होते. संबंधित कर्जदाराकडून कर्जाची परतफेड न झाल्यामुळे, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कायदेशीर आदेशानुसार या सदनिकेवर जप्तीची कारवाई करण्यात आली होती. बँकेने या फ्लॅटचा ताबा घेऊन तो सीलबंद केला होता आणि सुरक्षेसाठी 'बॉस' कंपनीचा सुरक्षा रक्षक (गार्ड) तैनात केला होता.

गार्डला ढकलून दिले, पहारीने तोडले सील
शनिवारी (दि. २८) सकाळी ही घटना घडली. बाबुराव वाघ, चंद्रकांत वाघ, एक महिला व त्यांच्या इतर साथीदारांनी मिळून या ठिकाणी बेकायदा प्रवेश केला. तिथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाला टोळक्याने धक्काबुक्की करत बाजूला सारले. त्यानंतर संशयितांनी जवळ असलेल्या लोखंडी पहारीने फ्लॅटचे सील केलेले कुलूप तोडले आणि सदनिकेत बेकायदा प्रवेश करून तिचा ताबा घेतला.

गुन्हा दाखल, पोलिसांचा तपास सुरू
याप्रकरणी बँकेचे प्रतिनिधी राजेश सिंग (रा. अशोकामार्ग) यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून बाबुराव वाघ, चंद्रकांत वाघ आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध शासकीय प्रक्रियेत अडथळा आणणे आणि बेकायदा ताबा मिळवणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार अतुल बनतोडे करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.