नाशिकरोड, (प्रतिनिधी) १ मार्च - शहरातील जेलरोड परिसरात एका तरुणाला अज्ञात व्यक्तीने फोन करून बोलावून घेत, टोळक्याने त्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्राणघातक हल्ल्यात तरुणाच्या डोक्यात वजनी वस्तू मारून त्याला गंभीर जखमी करण्यात आले असून, नाशिकरोड पोलीस ठाण्यात अज्ञात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ओम अनिल मैंद (वय २३, रा. चंद्रेश्वर नगर, जेलरोड) हा तरुण शुक्रवारी (दि. २७) रात्री आपल्या घरी होता. रात्रीच्या सुमारास त्याला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. समोरच्या व्यक्तीने त्याला परिसरातील 'शुभम मेडिकल स्टोअर्स' जवळ भेटण्यासाठी बोलावले. कोणताही संशय न आल्याने ओम तिथे पोहोचला.
महादेव मंदिर परिसरात नेऊन हल्ला
ओम शुभम मेडिकल जवळ पोहोचताच तिथे दोन दुचाकींवरून चार अनोळखी तरुण आले. "तुझ्याकडे काही काम आहे," असे सांगून त्यांनी ओमला जवळच असलेल्या महादेव मंदिर परिसरातील निर्जन ठिकाणी नेले. तिथे चर्चा सुरू असतानाच, पाठीमागे उभ्या असलेल्या एका तरुणाने ओमच्या कमरेत जोरदार लाथ मारली.
वजनी वस्तूने केला वार
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे ओम खाली कोसळला. तो सावरून उठण्याचा प्रयत्न करत असतानाच, टोळक्याने त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान, एका संशयिताने ओमच्या डोक्यात जोरदार वजनी वस्तूने प्रहार केला. या हल्ल्यात ओम गंभीर जखमी झाला असून, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ओमला सोडून हल्लेखोर पसार झाले.
पोलीस तपास सुरू
याप्रकरणी ओम मैंड याने दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला की अन्य काही कारणास्तव, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार शेख करत आहेत.