नाशिक, (प्रतिनिधी) १ मार्च - शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरू असतानाच पंचवटी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत मोटारसायकल चोरांच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीकडून सहा चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून, अटक करण्यात आलेल्या चार संशयितांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
गस्तीदरम्यान आली संशयास्पद हालचाल लक्षात
पंचवटी पोलिसांचे गुन्हे शोध पथक गुरुवारी (दि. २६) परिसरात गस्त घालत होते. दिंडोरी रोडवरील अवधूतवाडी भागातील MSEB कार्यालयाजवळ दोन तरुण बंद पडलेली दुचाकी सुरू करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांची हालचाल संशयास्पद वाटल्याने पथकाने त्यांना गाठले आणि चौकशी सुरू केली.
तपासात मोठे घबाड हाती
पोलिसी खाक्या दाखवताच संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातील (MH 15 KT 0137) ही मोटारसायकल पंचवटी परिसरातूनच चोरी केल्याचे समोर आले. अधिक तपासात या टोळीने दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने शहराच्या विविध भागांतून एकूण सहा दुचाकी चोरल्याचे मान्य केले. पोलिसांनी या सर्वांकडून सुमारे २ लाख २५ हजार रुपये किमतीच्या सहा मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
यांना ठोकल्या बेड्या
सुरज मुन्ना धोत्रे (वय २१, रा. तेलंगवाडी, फुलेनगर)
राज सुभाष धोत्रे (वय १९, रा. शनिमंदीर चाळ, पेठरोड)
तसेच त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे.
कारवाई करणारे पथक
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सतीश शिरसाठ, हवालदार महेश दांदुर्डीकर, संतोष पवार, कैलास शिंदे, अमोल काळे, जयवंत लोणारे, युवराज गायकवाड, वैभव परदेशी, सचिन बहिकर, अमोल देशमुख, योगेश वायकंडे, नितीन पवार व आगोणे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
नाशिक : शहरात मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच असून वेगवेगळ्या भागातून चार मोटारसायकली चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी पंचवटी व गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मखमलाबादरोड भागात राहणारे चैतन्य बबनराव बोडके (रा. प्रभात गौरव अपाय जाधव कॉलनी ) यांची मोटारसायकल मंगळवारी (दि.२४) रात्री त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. दुसरी घटना पेठरोड भागात घडली. दादासाहेब तुळशीराम आव्हाड (रा.साईनगर आरटीओ कॉर्नर दिंडोरीरोड ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. आव्हाड गेल्या मंगळवारी (दि.१७) दुपारच्या सुमारास पेठरोडवरील आरटीओ ऑफिस भागात गेले होते. पार्किंगमध्ये लावलेली त्यांची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. दोन्ही घटनांबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास हवालदार बाविस्कर आणि नांदुर्डीकर करीत आहेत. तिसरी घटना गंगापूररोड भागात घडली. सवित्र अशोक पोळ (रा. पाटील लॉन्स मागे, सुवर्ण नगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोळ यांची मोटारसायकल सौभाग्यनगर येथील केबीटी इंजिनिअरींग कॉलेज भागातील अन्वीता इन्डस्ट्रीज येथे पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि.२४) रात्री घडली. तर यश संजय निसाळ (रा.गजवक्र सोसा.केबीटी सर्कल जवळ गंगापूररोड) यांंची एमएच १५ बीटी २४८० मोटारसायकल रविवारी (दि.२२) रात्री त्यांच्या सोसायटीच्या आवारात लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. दोन्ही घटनांबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास हवालदार लोंढे करीत आहेत.