नाशिक, (प्रतिनिधी) २८ फेब्रुवारी - महापालिकेची परवानगी न घेता खोदकाम करणे मक्तेदार कंपनीस चांगलेच महागात पडले आहेत. मनपाच्या पाहणीत धक्कादायक प्रकार समोर आल्याने या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात कंपनीच्या संबधीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रेलटेल कंपनीचे मक्तेदार गिरीश केकरे, उपठेकेदार अभिजीत वाजे, संदेश ब्राम्हणकर, मनोहर सिंग व अन्य संबधीत अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत मनपाचे हेमंचंद्र नांदुर्डीकर यांनी फिर्याद दिली आहे. शहरात कुंभमेळ््यानिमित्त बांधकामाचा सपाटा सुरू आहे. विविध ठेकेदारांकडून वेगवेगळ््या ठिकाणी कामे सुरू असून या कामांची मनपाच्या बांधकाम विभागाच्या पथकाकडून नियमीत पाहणी केली जात आहे. गुरूवारी (दि.२६) सकाळी नांदुर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली पथक पाईप लाईनरोड भागात पाहणी करीत असतांना हा प्रकार समोर आला. नाशिक महापालिका अख्त्यारितील मालकी व कब्जात असलेल्या ३० मिटर रूंद विकास योजना आराखड्यातील रिलायन्स पेट्रोल पंप ते मार्क वन इमारती समोरील डीपी लगत रस्त्याचे स्मार्ट सिटी अंतर्गत रेलटेल कंपनीने घेतलेले काम विनापरवानगी सुरू असल्याचे पुढे आले आहे. चौक शीत मनपाच्या बांधकाम विभागाची कुठलीही परवानगी न घेता सदर कंपनीने पाईपलाईनरोड आनंदवली येथील रस्त्याचे सुमारे ५५० मी लांबीचे व ०.५० मी. रूंदीचे खोदकाम करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले आहे. अधिक तपास हवालदार अहिरे करीत आहेत.
.........
नाशिक : हद्दपारीची कारवाई करूनही विनापरवानगी शहरात वावरणाऱ्या तडिपारास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ पथकाने ही कारवाई पाथर्डी शिवारातील अहिल्यानगर - सुकदेवनगर मार्गावर केली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश विश्वनाथ वानखेडे (३३ रा.सुकदेवनगर, पाथर्डी शिवार) असे कारवाई करण्यात आलेल्या संशयित तडिपाराचे नाव आहे. वानखेडे याच्या वाढत्या गुन्हेगारीस रोखण्यासाठी शहर पोलीसांनी त्याच्याविरोधात हद्दपारीची कारवाई केली आहे. शहर आणि जिह्यात त्यास सहा महिन्यांसाठी तडिपार केलेले असतांनाही त्याचा वावर शहरातच होता. पोलीस त्याच्या मागावर असतांना गुरूवारी (दि.२६) दुपारी तो अहिल्यानगर - सुकदेवनगर मार्गावरील शेख यांच्या ऑईल गोडावूनजवळ पथकाच्या हाती लागला. याबाबत जमादार सानप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.
अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
नाशिक : भरधाव दुचाकी उभ्या डंम्परवर आदळल्याने झालेल्या अपघातात २३ वर्षीय दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात मुंबई आग्रा महामार्गावरील गरवारे पॉईंट भागात उड्डाणपूलावर झाला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
धिरज महेंद्र पवार (२३ मुळ रा. वडनेर भैरव ता.चांदवड हल्ली गोंदेफाटा ता.इगतपूरी) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. धिरज पवार गुरूवारी (दि.२६) दुपारच्या सुमारास पाथर्डी फाट्याकडून गोंदे फाट्याच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. मुंबई आग्रा महामार्गावरून तो प्रवास करीत असतांना गरवारे पॉईंट भागात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव दुचाकी उड्डाणपूलावर उभ्या असलेल्या डम्परवर आदळली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला होता. मित्र राहूल शिंदे याने त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.