नाशिक, (प्रतिनिधी) २७ फेब्रुवारी - शहर परिसरात मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असून, शहरातील वेगवेगळ्या भागातून तीन मुलींसह एक मुलगा बेपत्ता झाला आहे. सदर मुलांना कुणी तरी पळवून नेल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने याप्रकरणी म्हसरूळ, भद्रकाली व गंगापूर पोलीस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
किशोर सुर्यवंशी मार्गावरील दोन अल्पवयीन मुली गुरूवारी (दि.२६) रात्री पासून बेपत्ता आहेत. वेगवेगळ््या बिल्डींगमध्ये राहणाºया दोन्ही मुली मध्यरात्री कुटूंबियांची नजर चुकवून कोठे तरी निघून गेल्या असून सर्वत्र शोेध घेवूनही त्या मिळून न आल्याने पालकांनी पोलीसात धाव घेतली आहे. सदर मुलींना कुणी तरी फुल लावून पळवून नेल्याचा अंदाज व्यक्त होत असल्याने याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक जोशी करीत आहेत. दुसरी घटना मानेक्षानगर भागात घडली. रविंद्रनाथ टागोर भागात राहणारा मुलगा गेल्या पंधरा दिवसांपासून बेपत्ता आहे. शाळेतून घराकडे जात असतांना शनिवार (दि.१४) पासून तो बेपत्ता आहे. त्यास कुणी तरी पळवून नेल्याचा संशय पालकांनी व्यक्त केल्याने याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गंगापूररोड भागात राहणारी मुलगी बुधवारी (दि.२५) सकाळी मोपेड दुचाकी घेवून घराबाहेर पडली ती अद्याप परत आली नाही. तिला कुणी तरी पळवून नेल्याचा संशय व्यक्त होत असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार आहिरे करीत आहेत.
नाशिक : सावरकर नगर भागात भरदिवसा धाडसी घरफोडी झाली. यात चोरट्यांनी तब्बला सहा लाख रूपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारला असून त्यात २० हजाराच्या रोकडसह अमेरिकन डॉलर आणि सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी गंगापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश नानाजी दळवी (रा.लक्ष्मी व्हिला ब्रम्हेचा कॉलनी, सावरकरनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. दळवी कुटूंबिय गुरूवारी (दि.२६) दुपारी नेहमी प्रमाणे कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे लॅच लॉक तोडून घरात प्रवेश केला. घरात शिरलेल्या भामट्यांनी बेडरूममधील लाकडी कपाटात ठेवलेली २० हजाराची रोकड तसेच सुमारे २ लाख ७० हजार रूपये किमतीचे तीन हजार अमेरिकन डॉलर आणि सोन्याचांदीचे दागिणे असा ६ लाख ५ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.