एकनाथ शिंदेंकडील बांधकाम खाते दादा भुसे तर नगरविकास उदय सामंत यांच्याकडे...

Share:
Main Image
Last updated: 23-Feb-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २३ फेब्रुवारी - राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडील खात्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.  त्यानुसार सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) आणि नगरविकास या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी आता अनुक्रमे मंत्री दादा भुसे आणि उदय सामंत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून या बदलांबाबत माहिती दिली आहे. या निर्णयामुळे दादा भुसे यांच्याकडे आता सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) या विभागाची अतिरिक्त धुरा असेल, तर उदय सामंत यांच्याकडे नगरविकास खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

अधिवेशनाच्या काळात कामकाजाची विभागणी
अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विविध विभागांच्या प्रश्नांना उत्तरे देणे आणि चर्चेत सहभाग घेणे आवश्यक असते. मुख्यमंत्र्यांकडे अनेक महत्त्वाची खाती असल्याने कामाचा व्याप मोठा आहे. हाच व्याप हलका करण्यासाठी आणि कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी शिंदेंनी आपल्या विश्वासू मंत्र्यांवर ही जबाबदारी सोपवली असल्याचे बोलले जात आहे.

दादा भुसे आणि उदय सामंतांचे वजन वाढले
या नवीन फेरबदलांमुळे मंत्रिमंडळात दादा भुसे आणि उदय सामंत यांचे राजकीय वजन वाढल्याचे मानले जात आहे. दादा भुसे यांच्याकडे आधीच महत्त्वाची खाती असून, आता सार्वजनिक उपक्रम विभाग त्यांच्याकडे आल्याने रस्ते विकास आणि मोठ्या प्रकल्पांना गती देण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. दुसरीकडे, नगरविकास हे राज्याच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचे खाते मानले जाते, जे आता उदय सामंत सांभाळणार आहेत.

या निर्णयामुळे विरोधकांच्या प्रश्नांना तोंड देताना सरकार अधिक आक्रमकपणे आपली बाजू मांडू शकेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Advertisement

Comments

No comments yet.