भरधाव कारने उडवले... दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू...

Share:
Last updated: 23-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २३ फेब्रुवारी - पेठ रोडवरील तवली फाटा परिसरात रविवारी दुपारी एका भरधाव स्कार्पिओने दिलेल्या जोरदार धडकेत १५ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. मयूर सुरेश भोये (रा. लक्ष्मीनगर, पाट कॉर्नर, तवली फाटा) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. मयूर सध्या दहावीत शिकत असून त्याच्या परीक्षा सुरू असतानाच काळाने त्याच्यावर घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मयूर भोये हा रविवारी (दि. २२) दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास तवली फाटा येथील एका रसविक्रीच्या गाड्याजवळ उभा होता. यावेळी नाशिककडून पेठच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कार्पिओने (क्रमांक: MH 15 KK 6464) मयूरला भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, मयूर गंभीररीत्या जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला.

रुग्णालयात नेले, पण...
अपघातानंतर मयूरचे वडील सुरेश भोये यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले. पोटचा मुलगा डोळ्यादेखत गेल्याने भोये कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयूर सध्या दहावीची परीक्षा देत होता, त्याच्या निधनाने एका हुशार विद्यार्थ्याचा अंत झाला आहे.

चालकावर गुन्हा दाखल
या प्रकरणी मयूरचे वडील सुरेश भोये यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून स्कार्पिओ चालक अमोल रमेश ढगे (रा. रासेगाव, ता. दिंडोरी) आणि गणेश उत्तम पेलमहाले (रा. चापडगाव, ता. दिंडोरी) या दोघांविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश जोशी करीत आहेत.

भरधाव वेगामुळे निष्पाप जीवांचा बळी जात असल्याच्या घटना वाढल्या असून, पेठ रोडवर वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मंगळसूत्र चोरून नेले
मुलीला शिकवणीस सोडण्यासाठी जाणाºया दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र भामट्यांनी ओरबाडून नेले. ही घटना हिरावाडीरोडवरील भोरे सभागृह भागात घडली. या घटनेत ५० हजार रूपये किमतीच्या सौभाग्यावर चोरट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुनम संतोष लोखंडे (रा.भाऊसाहेब हिरे नगर, हिरावाडी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. लोखंडे या मुलीस शिकवणीसाठी सोडण्यास जात असतांना ही घटना घडली. मानेनगर येथून मायलेकी डबलसिट दुचाकीवर प्रवास करीत असतांना हिरावाडीरोडवरील भोरे सभागृह भागात मोपेडवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र हिसकावून नेले. उपनिरीक्षक नेमाणे तपास करीत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.