मालेगाव, (प्रतिनिधी) २२ फेब्रुवारी - मालेगाव महानगरपालिकेत आता ‘सोमय्या पॅटर्न’ चालणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत नवनिर्वाचित महापौर नसरीन बानो खालीद शेख यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. "आतापर्यंत झाले ते झाले, पण यापुढे त्यांचे लाड चालू देणार नाही," अशा आशयाचे पत्र महापौरांनी आयुक्तांना दिल्याने आगामी काळात मालेगावात मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत.
प्रशासकीय हस्तक्षेपावर महापौरांचे 'फर्मांन'
मालेगावमधील कथित जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याच्या नावाखाली किरीट सोमय्या यांनी वारंवार महापालिका आयुक्त, अप्पर जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाच्या बैठका घेतल्या आहेत. कोणत्याही घटनात्मक पदावर नसताना सोमय्या प्रशासनावर 'प्रभुत्व' गाजवत असल्याचा आक्षेप घेत महापौरांनी आता या हस्तक्षेपाला लगाम घातला आहे. १५ जानेवारी २०२६ च्या निवडणुकीनंतर आता पालिकेचा कारभार महासभेच्या आणि महापौरांच्या अखत्यारीत असल्याचे त्यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले आहे.
२४ फेब्रुवारीच्या दौऱ्यापूर्वीच नाकेबंदी
येत्या २४ फेब्रुवारी रोजी किरीट सोमय्या पुन्हा मालेगाव दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर महापौरांनी आयुक्त रवींद्र जाधव यांना लेखी पत्र देऊन कडक निर्देश दिले आहेत:
परवानगीशिवाय माहिती नाही: महासभेच्या परवानगीशिवाय कोणत्याही बाहेरील राजकीय व्यक्तीला अधिकृत दस्तऐवज किंवा गोपनीय माहिती सादर करू नये.
चौकशी समितीचा अहवाल प्रलंबित: १८ फेब्रुवारीच्या महासभेत या प्रकरणासाठी विशेष चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. हा अहवाल येईपर्यंत कोणतीही कागदपत्रे बाहेर देणे बेकायदेशीर ठरेल.अधिकारांची जाणीव: आयुक्त किंवा आरोग्य अधिकाऱ्यांनी महापौरांना विश्वासात घेतल्याशिवाय सोमय्यांसोबत कोणतीही बैठक घेऊ नये.
प्रशासनाची कोंडी?
आतापर्यंत सोमय्यांच्या दौऱ्यावेळी प्रशासनाकडून त्यांना विशेष वागणूक दिली जात होती. मात्र, लोकप्रतिनिधी म्हणून महापौरांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची गोची झाली आहे. सोमय्यांच्या दबावाला जुमानणार की महापौरांच्या निर्देशांचे पालन करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
"लोकशाहीत लोकप्रतिनिधी नसलेल्या व्यक्तीने प्रशासनावर हुकूमत गाजवणे नियमांच्या विरोधात आहे. जन्म दाखल्यांच्या नावाखाली अधिकाऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रयत्न आता खपवून घेतले जाणार नाहीत."
— नसरीन बानो खालीद शेख (महापौर, मालेगाव महापालिका)