नाशिक, (प्रतिनिधी) १८ फेब्रुवारी - शहरातील अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी (दि. १७) चेतनानगर परिसरात मोठी कारवाई करत एका २५ वर्षीय ड्रग्ज पेडलरला अटक केली आहे. या कारवाईचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे शहर पोलीस दलात नव्याने दाखल झालेल्या 'जॅक' नावाच्या श्वानाने घरझडती दरम्यान अत्यंत शिताफीने लपवून ठेवलेले ड्रग्ज शोधून काढले.
नेमकी घटना काय?
चेतनानगर भागातील हॉटेल साई पॅलेस जवळ असलेल्या राधाकृष्ण अपार्टमेंटमध्ये राहणारा वैभव पांडूरंग आव्हाड (२५) हा तरुण 'एमडी' (मॅफेड्रॉन) या घातक अंमली पदार्थाची विक्री करत असल्याची गुप्त माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने मंगळवारी या ठिकाणी छापा टाकला.
'जॅक'ची कामगिरी आणि जप्त मुद्देमाल
तपासादरम्यान पोलिसांसोबत असलेल्या 'जॅक' या श्वानाने संशयिताच्या घरातून ७ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज हुडकून काढले. बाजारभावानुसार या ड्रग्जची किंमत ३५ हजार रुपये इतकी आहे. ड्रग्जसोबतच पोलिसांनी इतर साहित्य असा एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
यांनी केली कारवाई
ही धडक कारवाई पोलीस आयुक्त संदिप कर्णीक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त संदिप मिटके आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात सहाय्यक निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील, रंजन बेंडाळे, भारत डंबाळे, संतोष सौंदाणे, गणेश वडजे, बाळासाहेब नांद्रे आणि अर्चना भड यांचा समावेश होता.
नाशिक शहरात अमली पदार्थांविरुद्ध पोलिसांनी छेडलेली ही मोहीम तरुणाईला या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.