येवला, (प्रतिनिधी) १८ फेब्रुवारी - महाराष्ट्राचे आराध्य दैवत व युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि.१९ फेब्रुवारी २०२६ रोजी सांयकाळी ६ वाजता येवला येथील भव्य ‘शिवसृष्टी’ प्रकल्पात युवा शाहीर रामानंद उगले यांच्या ‘शाहिरी शिवदर्शन’ या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच याच पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शिवसृष्टी प्रकल्पातील नयनरम्य कारंजाचे अनावरण करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी माजी खासदार समीर भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहे.
शिवसृष्टी प्रकल्प हा येवला शहराच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वैभवात भर घालणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम असून या प्रकल्पाच्या माध्यमातून शिवचरित्राचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा मंत्री छगन भुजबळ यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या माध्यमातून या प्रकल्पांत शिवरायांच्या पराक्रमाची प्रेरणा समाजमनात जागृत ठेवण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार यंदाच्या शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने ‘शिवसृष्टी’मध्ये ‘शाहिरी शिवदर्शन’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे युवा शाहीर रामानंद उगले व त्यांच्या सहकाऱ्यांच्या सादरीकरणातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास, शौर्य, पराक्रम आणि स्वराज्य स्थापनेचा प्रेरणादायी प्रवास पोवाड्यांच्या माध्यमातून सजीवपणे उलगडला जाणार आहे.
येवला शहरात उभारण्यात आलेला भव्य शिवसृष्टी प्रकल्प हा इतिहास, प्रेरणा आणि संस्कारांचा संगम आहे. येवला शहराच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पर्यटन विकासाला नवी दिशा देणारा हा भव्य दिव्य प्रकल्प आहे. येवला मतदारसंघातील मंत्री छगन भुजबळ यांच्या ड्रीम प्रोजेक्ट पैकी हा एक महत्वपूर्ण प्रकल्प असून तो आता पूर्णत्वाकडे आहे. या शिवसृष्टी प्रकल्पाच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा, पराक्रमाचा आणि विचारांचा जागर निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिवसृष्टी ही केवळ वास्तू नसून ती स्वराज्याच्या प्रेरणेचे, इतिहासाच्या जतनाचे आणि नव्या पिढीला संस्कार देणारे प्रेरणास्थान ठरणार आहे.
या प्रकल्पामध्ये सिंहासनाधिष्ठित छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला असून तो स्वराज्याच्या वैभवाचे प्रतीक ठरेल. तसेच अत्याधुनिक संग्रहालयाच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास, युद्धनीती, प्रशासन व्यवस्था आणि सामाजिक कार्य यांचे जतन व सादरीकरण करण्यात येणार आहे. यासोबतच वाचनालयाची उभारणी करून विद्यार्थ्यांना व अभ्यासकांना ऐतिहासिक व शैक्षणिक माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शिवसृष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूरवीर मावळ्यांचा इतिहास, त्यांच्या पराक्रमाची माहिती सांगणारे विविध शिल्परचना उभारण्यात आल्या असून त्यामुळे पर्यटकांना शिवकालीन इतिहासाचा जिवंत अनुभव घेता येणार आहे. या प्रकल्पामुळे येवला शहराच्या पर्यटन विकासाला चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. शिवसृष्टी हा प्रकल्प भावी पिढीला स्वराज्याच्या इतिहासाची ओळख करून देणारा आणि राष्ट्रप्रेमाची भावना दृढ करणारा केंद्रबिंदू ठरेल. येवल्याच्या सर्वांगीण विकासासाठी सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम असून शासनाच्या सहकार्याने हा प्रकल्प अधिक समृद्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवसृष्टी प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशावर एक महत्त्वाचे आकर्षण ठरणार आहे. या प्रकल्पाचा भाग असलेल्या नयनरम्य कारंजाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास येवला शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवप्रेमी नागरिक तसेच युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांच्या शौर्यगाथांचा प्रेरणादायी स्वर अनुभवावा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार यांनी यांनी केले आहे.