नाशिकमध्ये पादचारी असुरक्षित... या दोन घटनांनी शहर हादरले...

Share:
Last updated: 18-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १८ फेब्रुवारी - नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून रस्त्याने चालणे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी धोकादायक बनले आहे. पंचवटी भागात एका तरूणीचा विनयभंग करून फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली, तर अशोका मार्ग परिसरात तोतया पोलिसांनी एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेला गंडा घालत साडेतीन लाखांचे दागिने लांबवले. या दोन्ही घटनांमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मैत्रीच्या नावाखाली तरूणीचा छळ; लग्नासाठी धमकावणारा अटकेत

पहिली घटना पंचवटीतील सुदर्शन कॉलनी भागात घडली. पीडित तरूणी सायंकाळच्या सुमारास पायी घराकडे जात असताना, पंकज तान्हाजी येलमामे (२४, रा. कर्णनगर) या संशयिताने तिची वाट अडवली. "आपली जुनी मैत्री आहे, तू माझ्याशी लग्न कर," असा तगादा लावत त्याने विनयभंग केला. पीडितेने विरोध केला असता, मैत्रीत काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक निरीक्षक पाटील पुढील तपास करत आहेत.

'पोलिसांचा नवा नियम आहे' सांगत वृद्धेला लुटले
दुसरी खळबळजनक घटना अशोका मार्ग येथे भरदिवसा घडली. विना राजमल काबरे (७५) या ज्येष्ठ महिला बँकेतून घरी परतत असताना धारकर स्टील दुकानाजवळ दोन भामट्यांनी त्यांना गाठले. "आम्ही पोलीस आहोत, सोन्याचे दागिने घालून फिरू नका असा नवा नियम आला आहे," असे सांगून त्यांनी महिलेचा विश्वास संपादन केला.
मदतीचा बहाणा करत या तोतया पोलिसांनी महिलेचे ३ लाख ५० हजार रुपये किमतीचे दागिने (सोनसाखळी व दोन बांगड्या) काढून घेतले आणि हातचलाखीने ते लंपास केले. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून उपनिरीक्षक शेख तपास करत आहेत.

नागरिकांना आवाहन: पोलिसांनी वेळोवेळी आवाहन केले आहे की, रस्त्यात कोणीही अनोळखी व्यक्ती 'पोलीस' असल्याचे सांगून दागिने काढण्यास सांगत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका. अशा वेळी तातडीने जवळच्या लोकांशी किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.

Advertisement

Comments

No comments yet.