नाशिक, (प्रतिनिधी), दि. १५ फेब्रुवारी २०२६ - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक गोकुळ पिंगळे यांना बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन चक्क १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात संशयित महिला आणि तिच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, दिव्या ठक्कर आणि तिचा मुलगा तन्वीर (पूर्ण नाव उपलब्ध नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पिंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २९ जून २०२५ ते १२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत संशयित मायलेकांनी पिंगळे यांना सातत्याने त्रास दिला. गंगापूर लिंक रोडवरील 'ग्रेप अॅम्बसी' समोरील पिंगळे यांच्या घराबाहेर येऊन या दोघांनी वारंवार आरडाओरड आणि शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
'सेटलमेंट'साठी १० कोटींचा तगादा
संशयित महिलेने पिंगळे यांना धमकी दिली की, जर त्यांनी १० कोटी रुपये दिले नाहीत, तर ती त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल. तसेच, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बदनामीकारक व्हिडिओ आणि मेसेज पोस्ट करून त्यांचे राजकीय व सामाजिक आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकीही देण्यात आली.
पिंगळे यांचा आरोपांचा इन्कार
या प्रकरणावर बोलताना गोकुळ पिंगळे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. "संबंधित महिलेला मी ओळखत नाही, तिच्याशी माझा कोणताही आर्थिक व्यवहार किंवा परिचय नाही," असे त्यांनी पोलिसांना स्पष्ट केले आहे. केवळ बदनामी करण्याच्या उद्देशाने आणि पैशांच्या हव्यासापोटी हा बनाव रचला गेल्याचा दावा त्यांनी केला आहे.
पोलीस तपास सुरू
पंचवटी पोलिसांनी या प्रकरणी खंडणी आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. संशयित दिव्या ठक्कर आणि तिचा मुलगा सध्या पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
या कटात सहभागी असलेल्या सदर महिलेच्या मुलाचे नाव यापूवीर्ही वादात आले होते. सन २०२५ मध्ये हॉटेल याहू येथे मद्यपार्टीच्या बिलावरून झालेल्या मारहाणीच्या घटनेत तो जखमी झाल्याची नोंद आहे. तसेच डिसेंबर २०२४ मध्ये सावरकरनगर परिसरात जुन्या वादातून त्याच्यावर हल्ला झाल्याचा गुन्हा गंगापूर पोलिस ठाण्यात दाखल आहे. या पार्श्वभूमीवर सद्य प्रकरणाकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. पंचवटी पोलिसांनी खंडणी व धमकीसंदभार्तील कलमान्वये गुन्हा दाखल करून तपासाची सूत्रे वेगाने हलवली आहेत. दोघांचा मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फूटेज व सोशल मीडिया अकाऊंट्सची पडताळणी सुरू आहे
खंडणीपुरतेच की
हे प्रकरण केवळ खंडणीपुरते मर्यादित आहे की यामागे काही राजकीय षडयंत्र दडले आहे? तसेच संशयित महिलेने यापूर्वीही कोणाला अशा प्रकारे धमकावले आहे का? या दिशेने पोलीस तपास करत आहेत.