नाशिकच्या उत्तम नगर भागात दिवसाढवळ्या घडला हा धक्कादायक प्रकार...

Share:
Last updated: 15-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १५ फेब्रुवारी - शहरातील सिडको भागातील उत्तमनगर परिसरात असलेल्या श्रीराम मंदिरात भरदिवसा चोरीची खळबळजनक घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून श्रीराम, लक्ष्मण आणि सीता मातेच्या मूर्तींवरील सुमारे दीड किलो वजनाचे चांदीचे मुकूट चोरून नेले आहेत. या घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, अंबड पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

स्वच्छता कर्मचाऱ्यांमुळे घटना उघड
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. १३) दुपारी १ ते ४ च्या दरम्यान ही चोरी झाली. दुपारी चारच्या सुमारास मंदिरातील स्वच्छता करणाऱ्या महिला कर्मचारी नेहमीप्रमाणे कामासाठी आल्या असता, त्यांना मूर्तींवरील मुकूट गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने ही बाब मंदिर व्यवस्थापक जिभाऊ बच्छाव यांना सांगितली. चोरीची माहिती मिळताच मंदिर प्रशासनाने अंबड पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.

दीड किलो चांदीवर डल्ला
चोरट्यांनी लंपास केलेले तिन्ही मुकूट सुमारे दीड किलो वजनाचे असून, त्यांची बाजारपेठ किंमत साधारण २ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, एकादशीनिमित्त मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असताना आणि गाभाऱ्याचा दरवाजा आतून लावलेला असतानाही चोरट्याने उडी मारून आत प्रवेश केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पोलिसांकडून सीसीटीव्हीची तपासणी
घटनेची माहिती मिळताच अंबड गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असून मंदिर परिसर आणि आजूबाजूच्या मार्गावरील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

भाविकांमध्ये तीव्र संताप
उत्तमनगर भागातील हे श्रीराम मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. भरदिवसा देवाच्या अंगावरील दागिने चोरीला गेल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. मंदिर प्रशासनाच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांचे पथक चोरट्यांचा माग काढत आहेत.

 

'सुपरफास्ट नाशिक'चे मुख्य संपादक, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक भावेश ब्राह्मणकर यांचे 'अरुणोदय' पुस्तक प्रकाशन पूर्व बुकिंगसाठी उपलब्ध झाले आहे.
प्रथितयश दिलीपराज प्रकाशनाने २५ टक्के घसघशीत सूट त्यासाठी दिली आहे. 
पुस्तक बुकिंगसाठी खालील लिंकवर क्लिक करावे

https://www.diliprajprakashan.in/products/arunoday-by-bhavesh-brahmankar

Advertisement

Comments

No comments yet.