कुंभमेळ्यासाठी दिल्ली आयआयटी आणि नागपूर आयआयएमचे तज्ज्ञ नाशकात...

Share:
Main Image
Last updated: 14-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १४ फेब्रुवारी - सिंहस्थ २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे नाशिक ग्रामीण व त्र्यंबकेश्वर परिसरातील वाहतूक व्यवस्थापन, पार्किंग नियोजन आणि विविध विभागांतील समन्वयाचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक गुरुवारी घेण्यात आली. या बैठकीस नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे अध्यक्षस्थानी होते.

बैठकीस कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, महामार्ग वाहतूक शाखेच्या पोलीस अधीक्षक रुपाली अंबुरे, कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त सौरीश सहाय, तसेच पेठ उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच आयआयएम नागपूर आणि आयआयटी दिल्लीच्या तज्ज्ञ टीमनेही उपस्थित राहून एकात्मिक वाहतूक आणि गतिशीलता आराखड्यांवर चर्चा केली.

बैठकीत नाशिक ग्रामीण भागातील प्रमुख मार्ग, वाहतूक वळविण्याचे पर्यायी रस्ते, पार्किंग व्यवस्थापन आणि त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या संपर्क मार्गांची क्षमता वाढविण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. प्रमुख धार्मिक स्थळांकडे भाविकांची सुरळीत हालचाल सुनिश्चित करण्यासाठी विशेष नियोजनाची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. विशेषतः शाही स्नानासारख्या गर्दीच्या दिवसांमध्ये वाहनांची आणि भाविकांची सुरक्षित व शिस्तबद्ध हालचाल कशी राखता येईल, यावर भर देण्यात आला.

महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रण, दिशादर्शक फलक, मार्गांचे पुनर्रचना नियोजन आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी पर्यायी आराखडा तयार ठेवण्याबाबत अधिकाऱ्यांनी चर्चा केली. संवेदनशील आणि गर्दीच्या भागांत वाहन व पादचारी हालचालींचे विभाजन करण्याची गरजही बैठकीत मांडण्यात आली.

कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “सिंहस्थ २०२७ साठी शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांमध्ये काटेकोर वाहतूक नियोजन आवश्यक आहे. सर्व विभागांमध्ये स्पष्ट जबाबदाऱ्या निश्चित करून समन्वित आणि सुसंगत वाहतूक व्यवस्था उभी करणे हा आमचा उद्देश आहे. आगाऊ नियोजन आणि विभागांतील प्रभावी समन्वयामुळे भाविकांची सुरक्षित आणि सुरळीत हालचाल सुनिश्चित करता येईल.”

सिंहस्थ २०२७ च्या पूर्वतयारीचा भाग म्हणून कुंभमेळा प्राधिकरणाकडून पायाभूत सुविधा आणि वाहतूक व्यवस्थेचा नियमित आढावा घेतला जात असून, त्याचाच एक भाग म्हणून ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

 

'सुपरफास्ट नाशिक'चे मुख्य संपादक, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक भावेश ब्राह्मणकर यांचे 'अरुणोदय' पुस्तक प्रकाशन पूर्व बुकिंगसाठी उपलब्ध झाले आहे.
प्रथितयश दिलीपराज प्रकाशनाने २५ टक्के घसघशीत सूट त्यासाठी दिली आहे. 
पुस्तक बुकिंगसाठी खालील लिंकवर क्लिक करावे

https://www.diliprajprakashan.in/products/arunoday-by-bhavesh-brahmankar

Advertisement

Comments

No comments yet.