नाशिक, (प्रतिनिधी) १३ फेब्रुवारी - अल्पवयीन मुलीचा अज्ञानपणाचा फायदा घेत तिला पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम नातेवाईकास नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि एक लाख रुपये दंडाची कठोर शिक्षा सुनावली आहे. लक्ष्मण राधाकिसन कांबळे (३६) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या निकालानंतर पीडितेच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
नेमकी घटना काय?
आरोपी लक्ष्मण कांबळे आणि पीडित मुलगी हे एकमेकांचे नातेवाईक असून ते एकत्रच वास्तव्यास होते. जुलै २०२४ ते १० ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आरोपीने पीडितेच्या अगतिकतेचा फायदा घेतला. आई-वडिलांची खोटी शपथ घालून आणि वारंवार दमदाटी करून त्याने मुलीवर अत्याचार केला. एवढ्यावरच न थांबता, लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिला पुणे येथे पळवून नेले आणि तिथेही तिच्यावर बलात्कार केला.
इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल
याप्रकरणी पीडितेच्या बहिणीने धाडस दाखवून इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सुहासिनी बारेला यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून न्यायालयात ठोस पुरावे आणि दोषारोपपत्र सादर केले होते.
न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. व्ही. घुले यांच्या न्यायालयात चालला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता लीना चव्हाण यांनी प्रभावी युक्तिवाद केला. साक्षीदार, पंच आणि तपासी अधिकाऱ्यांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.
शिक्षेचे स्वरूप:
मुख्य शिक्षा: जन्मठेप.
दंड: १ लाख रुपये (दंड न भरल्यास अतिरिक्त कारावास).
नुकसान भरपाई: दंडाच्या रकमेतील ७५ हजार रुपये पीडितेस नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
'सुपरफास्ट नाशिक'चे मुख्य संपादक, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक भावेश ब्राह्मणकर यांचे 'अरुणोदय' पुस्तक प्रकाशन पूर्व बुकिंगसाठी उपलब्ध झाले आहे.
प्रथितयश दिलीपराज प्रकाशनाने २५ टक्के घसघशीत सूट त्यासाठी दिली आहे.
पुस्तक बुकिंगसाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://www.diliprajprakashan.in/products/arunoday-by-bhavesh-brahmankar