प्रेमप्रकरणाच्या भीतीने उरकला मुलीचा विवाह... असा घडला नाट्यमय प्रकार...

Share:
Last updated: 13-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १३ फेब्रुवारी - प्रेमप्रकरणाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी कुटुंबाने घाईघाईत उरकलेला बालविवाह पालकांच्याच अंगलट आला आहे. आडगाव परिसरातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्यानंतर, माहेरी आलेल्या पीडितेने प्रियकराच्या मदतीने थेट पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी पतीसह सासर आणि माहेरच्या नातेवाईकांविरुद्ध बलात्कार, पोक्सो (POCSO) आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
आडगाव शिवारात राहणारी १५ वर्षीय मुलगी गेल्या वर्षी इयत्ता नववीत शिकत असताना तिची ओळख परिसरातील एका तरुणाशी झाली. या मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. याची कुणकुण लागताच कुटुंबाने तिला घराबाहेर पडण्यास मज्जाव केला व तिला नाशिक रोड येथील मामाच्या घरी पाठवले. मात्र, नातेवाईकांच्या मध्यस्थीनंतरही मुलगी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर तिचा विवाह लावून देण्याचा निर्णय घेण्यात आला.

घाईत उरकला विवाह
छत्रपती संभाजीनगर येथील नातेवाईकांनी मध्यस्थी करून कन्नड तालुक्यातील चिखलठाण येथील स्थळ शोधले. २३ मार्च रोजी संभाजीनगर येथील एका मंगल कार्यालयात हा बालविवाह पार पडला. लग्नानंतर अवघ्या १४-१५ वर्षांची ही मुलगी सासरी नांदायला गेली, जिथे तिच्यावर अत्याचार झाला.

अकरा महिन्यांनंतर 'सिनेस्टाईल' वळण
गेल्या ११ महिन्यांपासून सासरी असलेल्या पीडितेला काही दिवसांपूर्वीच वडिलांनी माहेरी आणले होते. कुटुंबिय कामावर गेल्याची संधी साधून तिने आपल्या जुन्या मित्राशी संपर्क साधला. त्या तरुणाने पीडितेला कायदेशीर मदतीचा सल्ला दिला. त्यानंतर दोघांनी थेट आडगाव पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केली.

नातेवाईकांचे धाबे दणाणले
मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिचे पती, सासू-सासरे, वडील, मामा-मामी आणि काका-मावशी अशा सर्व जबाबदार नातेवाईकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार पीडितेची रवानगी सध्या निरीक्षणगृहात करण्यात आली आहे.

महत्त्वाची कलमे:
 बालविवाह प्रतिबंधक कायदा
 लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो)
 भारतीय न्याय संहितेनुसार बलात्काराचा गुन्हा

 

'सुपरफास्ट नाशिक'चे मुख्य संपादक, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक भावेश ब्राह्मणकर यांचे 'अरुणोदय' पुस्तक प्रकाशन पूर्व बुकिंगसाठी उपलब्ध झाले आहे.
प्रथितयश दिलीपराज प्रकाशनाने २५ टक्के घसघशीत सूट त्यासाठी दिली आहे. 
पुस्तक बुकिंगसाठी खालील लिंकवर क्लिक करावे

https://www.diliprajprakashan.in/products/arunoday-by-bhavesh-brahmankar

Advertisement

Comments

No comments yet.