कुंभमेळ्यानिमित्त नाशकात प्रथमच उभारली जाणार भव्य टेंट सिटी..

Share:
Main Image
Last updated: 12-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १२ फेब्रुवारी - सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर टेंट सिटी व साधुग्राम परिसरातील तात्पुरत्या पायाभूत सुविधांना मान्सून सुरक्षित करण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने बुधवारी तंबू उभारणी व पायाभूत सुविधा क्षेत्रातील तांत्रिक भागीदारांसोबत पाठपुरावा बैठक घेतली. जानेवारीत झालेल्या प्राथमिक चर्चेनंतर ही बैठक घेण्यात आली असून विविध तांत्रिक मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.

कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त सौरीश सहाय, नाशिक महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल, मुख्याधिकारी अमोल चौधरी, प्राधिकरणाचे तहसीलदार योगेश चंद्रे तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण व इतर अधिकारी आणि संबंधित प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत गत कुंभमेळ्यांतील अनुभवांचा आढावा घेऊन पावसाळ्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिक सक्षम तांत्रिक मानके निश्चित करण्यावर भर देण्यात येण्याची चर्चा झाली.

बैठकीत मान्सून काळात प्रभावी ठरलेल्या उपायांची चर्चा झाली. पूर्ण जल व अग्निरोधक तंबू साहित्य, जोरदार वाऱ्यांना तोंड देणारी अँकरिंग व्यवस्था, उंचावलेली फ्लोअरिंग, दुहेरी छप्पर, ‘स्टॉर्म फ्लॅप्स’  अशा उपाययोजनांचा विचार करण्यात आला.

सततच्या पावसात झिरपणे व गळती टाळण्यासाठी तंबूंच्या उपाययोजना, जमिनीच्या पातळीवरील संपर्कभाग सुरक्षित करणे, तसेच तंबू समूहाभोवती योग्य पाणी निचऱ्याची रचना यावरही चर्चा झाली.

विद्युत सुरक्षेबाबत प्रत्येक तंबू समूहासाठी सक्षम विद्युत व्यवस्था, पावसापासून विद्युत पॅनेलचे संरक्षण, बाह्य वापरासाठी योग्य दर्जाची अग्निप्रतिरोधक केबल तसेच विद्युत बिघाडांसाठी आपत्कालीन प्रतिसाद आराखडा तयार करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

पाणीपुरवठ्याच्या संदर्भात सततच्या पावसात पाईप गळती रोखणे, पाणी साचू नये यासाठी निचऱ्याची व्यवस्था, आणि पाईप फुटीच्या प्रसंगी तातडीची कृती आराखडा यावरही विचारमंथन झाले.

टेंट सिटीतील काही भागात बांबूआधारित संरचना उभारल्या जाणार असल्याने त्यासाठी स्थैर्यपूर्ण आणि हवामान प्रतिरोधक डिझाइन अवलंबण्याच्या सूचना देण्यात आल्या.

आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, “सिंहस्थ काळात मान्सून ही मोठी परीक्षा असते. कोणतीही सेवा खंडित होऊ नये आणि भाविकांच्या सुरक्षिततेत तडजोड होऊ नये, यासाठी नियोजन अधिक काटेकोरपणे केले जात आहे.”

 

'सुपरफास्ट नाशिक'चे मुख्य संपादक, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक भावेश ब्राह्मणकर यांचे 'अरुणोदय' पुस्तक प्रकाशन पूर्व बुकिंगसाठी उपलब्ध झाले आहे.
प्रथितयश दिलीपराज प्रकाशनाने २५ टक्के घसघशीत सूट त्यासाठी दिली आहे. 
पुस्तक बुकिंगसाठी खालील लिंकवर क्लिक करावे

https://www.diliprajprakashan.in/products/arunoday-by-bhavesh-brahmankar

Advertisement

Comments

No comments yet.