त्र्यंबकेश्वर शहरात होणार हे मोठे विकास प्रकल्प...

Share:
Main Image
Last updated: 11-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ११ फेब्रुवारी - नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील दर्शन पथाच्या नियोजन, विकास व संवर्धनासंदर्भात उच्चस्तरीय आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथील समिती सभागृहात पार पडली. ही बैठक नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली.

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ दरम्यान विशेषतः अमृत स्नान दिवशी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा असल्याने सुरक्षित, सुव्यवस्थित व आध्यात्मिक वातावरणाला अनुरूप असा दर्शन पथ उभारण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.

या बैठकीस त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार,उपनागराध्यक्षा मंजुताई वारूणसे व सर्व सन्मा.नगरसेवक तसेच  त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील, नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे मुख्याधिकारी अमोल चौधरी, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सत्यप्रिय ज्ञानेश्वर शुक्ल, पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, प्रतिनिधी अतुल जोशी  आणि एमएसआयडीसीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत त्र्यंबकेश्वर येथील टप्पा २ विकासकामांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. सुमारे रु. ३९० कोटी खर्चाच्या या कामांद्वारे यात्रेकरूंसाठी आवश्यक पायाभूत सुविधा अधिक सक्षम करणे, गर्दी व्यवस्थापन सुधारणे आणि भाविकांच्या एकूण अनुभवात गुणवत्ता वाढविणे हा उद्देश आहे. मंजूर कामांमध्ये दर्शन पथ व घाटांचा विकास, शाही मार्गाचे पुनर्विकास व सौंदर्यीकरण, विधी भवन व संलग्न धार्मिक सुविधांची उभारणी, शिवसृष्टीसह उद्याने व सुशोभीकरण प्रकल्पांचा विकास, तसेच मेळा कालावधीत विक्रेत्यांसाठी नियोजित व सुव्यवस्थित सुविधा उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे.

उपस्थित सर्व घटकांमध्ये नियोजन पद्धती, अंमलबजावणीचे वेळापत्रक, स्थानिक गरजांचा समावेश तसेच त्र्यंबकेश्वरचे पारंपरिक व धार्मिक स्वरूप जपण्याबाबत सक्रिय चर्चा व परस्पर संवाद झाला. कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी कुंभमेळा प्राधिकरण, नगरपरिषद, देवस्थान ट्रस्ट, पुरोहित संघ व इतर संबंधित यंत्रणांमध्ये समन्वयाने कार्य करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

मंजूर कामांच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्यासाठी त्र्यंबक येथे सातत्याने आढावा बैठका आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Advertisement

Comments

No comments yet.