नाशिक, (प्रतिनिधी) १० फेब्रुवारी - तेलंगणा शासनाचे वरिष्ठ प्रतिनिधीमंडळ आजपासून नाशिक येथे दोन दिवसीय अभ्यास दौर्यावर आले असून नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ संदर्भातील प्रशासकीय व पायाभूत तयारीचा आढावा घेत आहे. तेलंगणातील 'गोदावरी पुष्करम २०२७' आयोजनासाठी कार्यपद्धती, नियोजन व संस्थात्मक समन्वय याबाबत प्रत्यक्ष अनुभव घेणे हा या दौर्याचा उद्देश आहे.
दौर्याच्या पहिल्या दिवशी प्रतिनिधीमंडळाने नाशिक शहरातील कुंभमेळा संदर्भातील महत्त्वाच्या स्थळांना भेट दिली. रामकुंड व गोदावरी नदीकाठ परिसरात घाट क्षमता, नदीकाठावरील पायाभूत सुविधा, सुरक्षाव्यवस्था तसेच धार्मिक विधी व्यवस्थापनाचा आढावा घेण्यात आला. पंचवटी परिसरात पादचारी वाहतूक नियोजन, फेरीवाला व्यवस्थापन आणि वारसा क्षेत्राशी संबंधित नियोजनाची पाहणी करण्यात आली. काळाराम मंदिर परिसरात मंदिर प्रांगण व्यवस्थापन व गर्दी नियंत्रण उपाययोजनांवर चर्चा झाली. तसेच साधुग्राम येथे संत-महंतांच्या तात्पुरत्या निवास व्यवस्थेचे नियोजन समजून घेण्यात आले व सायंकाळी गोदा आरतीचे निरीक्षण करण्यात आले.
यावेळी कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह आणि नाशिक महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर आणि नाशिक पोलीस विभागातील अधिकारी, नाशिक महानगरपालिका अधिकारी तसेच कुंभमेळा प्राधिकरणाचे संबंधित विभागप्रमुख उपस्थित होते.
बैठकीत विविध यंत्रणांमधील समन्वय, जबाबदाऱ्यांचे वाटप आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीची यंत्रणा यावर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या धार्मिक मेळाव्यांच्या व्यवस्थापनातील अनुभवांची देवाणघेवाण यावेळी करण्यात आली. बैठकीत कुंभमेळा प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या क्षेत्रनिहाय तयारी, विभागांतील समन्वय, पायाभूत सुविधा उभारणी, स्वच्छता नियोजन, सुरक्षा व्यवस्था आणि गर्दी नियंत्रण धोरणांवर सविस्तर चर्चा झाली.
हे प्रतिनिधीमंडळ तेलंगणा शासनाच्या धर्मादाय व देवस्थान विभागाच्या प्रधान सचिव शैलजा रमैय्यर (आयएएस) यांच्या नेतृत्वाखाली आले आहे. प्रतिनिधीमंडळात गोविंद हरी, धार्मिक सल्लागार (धर्मादाय विभाग); सोमराजू, मंत्री (धर्मादाय) यांचे विशेष कार्याधिकारी; रामकृष्ण, प्रादेशिक सह आयुक्त (धर्मादाय विभाग); तसेच दुर्गा प्रसाद, कार्यकारी अभियंता (धर्मादाय विभाग) यांचा समावेश आहे.
दौर्याच्या दुसऱ्या दिवशी प्रतिनिधीमंडळ त्र्यंबकेश्वर येथे भेट देऊन मंदिर परिसर नियोजन, भाविकांच्या हालचालीचे व्यवस्थापन आणि कुंभमेळा प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या संबंधित पायाभूत सुविधांचा आढावा घेणार आहे.