सिनेस्टाईल कारवाई... दीड कोटींचा मद्यसाठा जप्त...

Share:
Main Image
Last updated: 10-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १० फेब्रुवारी - नाशिक-पुणे महामार्गावर बेकायदा मद्यवाहतुकीच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. शिंदे पळसे शिवारात एका आयशर ट्रकवर टाकलेल्या छाप्यात तब्बल १ कोटी ५४ लाख ९० हजार ८०० रुपयांचा गोवा बनावट मद्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी राजस्थानमधील एका चालकाला अटक करण्यात आली आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, गोवा बनावटीच्या दारूची नाशिकमार्गे बेकायदेशीर वाहतूक होणार होती. या माहितीच्या आधारे भरारी पथक क्रमांक १ ने रविवारी (दि. ८) शिंदे पळसे टोलनाका परिसरात सापळा रचला. इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर संशयास्पद वाटणारा सहाचाकी आयशर ट्रक (क्रमांक KA 52 C 3687) अडवण्यात आला.

मोठा मुद्देमाल हस्तगत
ट्रकची झडती घेतली असता, त्यात महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला 'रॉयल ब्ल्यू व्हिस्की' या विदेशी मद्याचा प्रचंड साठा आढळून आला. पथकाने तातडीने ट्रकसह सर्व मद्यसाठा जप्त केला. या कारवाईत:
एकूण जप्त मुद्देमाल: १ कोटी ५४ लाख ९० हजार ८०० रुपये.
अटक संशयित: कंवरा राम हरभज राम (वय २८, रा. बाडमेर, राजस्थान).

तपास सुरू
ही दारू नक्की कोठून आणली होती आणि ती कोणापर्यंत पोहोचवली जाणार होती, याचा सखोल तपास आता उत्पादन शुल्क विभाग करत आहे. ही धडक कारवाई आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे आणि विभागीय उपायुक्त उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विलास बामणे, संजय सावंत, गणेश नागरगोजे व त्यांच्या पथकाने यशस्वी केली. गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक संजय सावंत करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.