नाशिक, दि. 21 डिसेंबर - दिनांक २३ डिसेंबर ते २८ डिसेंबर दरम्यान जबलपूर मध्य प्रदेश येथे १९ वर्षा आतील शालेय राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक खो खो संघात संस्कृती नाशिक आणि स्व. सौ सुरेखा ताई भोसले निवासी खो खो प्रबोधिनीची खेळाडू सुषमा चौधरी हिची राज्याची कर्णधार म्हणून निवड झाली आहे.
सुषमाने या पूर्वी १७ वर्षा आतील शालेय राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील विजेत्या महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व केले होते.त्याच राष्ट्रीय स्पर्धेत तिची देशातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड झाली होती.१७ आणि १९ दोन्ही वयोगटातील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत राज्याचे नेतृत्व करणारी सुषमा ही नाशिकच्या ५० वर्षाच्या इतिहासातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे.सुषमा ही वाय डी.बिटको कन्या शाळा आणि कनिष्ट महाविद्यालयाची खेळाडू असून सलग दुसऱ्या वर्षी १९ वर्षा आतील शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याच्या संघात निवड झाली आहे.
राज्य खो खो संघाचे स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबिर दिनांक १६ ते २१ डिसेंबर दरम्यान नाशिक येथे आयोजित केले होते. सुषमा चौधरी उमेश आटवणे आणि गीतांजली सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे वर्षभर सकाळ आणि सायंकाळी नियमित सराव करत असते. तिच्या निवडीबद्दल नाशिक जिल्हा खो खो असोसिएशनचे अध्यक्ष डॉ प्रदीप पवार, दी न्यू एज्युकेशन सोसायटी नाशिकचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन,मुख्याध्यापिका सौ.सविता कुशारे, उप मुख्याध्यापक राजेंद्र सोमवंशी आजीवन अध्यक्ष रमेश भोसले, कार्याध्यक्ष आनंद गारंमपल्ली, संस्कृती नाशिकचे अध्यक्ष शाहू महाराज खैरे, खजिनदार सुनील गायकवाड आणि अन्य पदाधिकारी यांनी अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेतील विजेतेपदासाठी शुभेच्छा दिल्या.