काल नगराध्यक्ष म्हणून निवड... आज झाडू घेऊन थेट रस्त्यावर... या नगराध्यक्षांची राज्यभरात चर्चा...

Share:
Main Image
Last updated: 22-Dec-2025

संगमनेर, दि. 21 डिसेंबर - संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत दैदिप्यमान यश मिळवल्यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे व सर्व नगरसेवकांनी शहर स्वच्छतेपासून आपल्या कार्यकाळाची सुरुवात केली. या उपक्रमांतर्गत संगमनेर बसस्थानक परिसर, नाशिक–पुणे महामार्गावरील लक्ष्मी रोड परिसरात हातात झाडू घेऊन साफसफाई करण्यात आली.
संगमनेर हायटेक बसस्थानक येथील दत्त मंदिरात सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांसह श्री दत्ताची आरती करून परिसर स्वच्छतेसह कामाला सुरुवात करण्यात आली.

हायटेक बसस्थानक परिसर हा संगमनेर शहराचा अत्यंत महत्त्वाचा भाग असून, मागील काही काळात अनधिकृत फ्लेक्समुळे परिसराचे विद्रूपीकरण झाले होते. तसेच अस्वच्छतेचीही समस्या निर्माण झाली होती. याची दखल घेत नव्या पदाधिकाऱ्यांनी व्यापक स्वच्छता मोहीम हाती घेतली. रात्रीच्या वेळी संगमनेर बसस्थानक तसेच नाशिक–पुणे रोडवरील ऑरेंज कॉर्नर ते बसस्थानक हा संपूर्ण परिसर धुऊन काढण्यात आला, तर सकाळी स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यावेळी सफाई कामगार माताभगिनींसोबत आपुलकीने संवाद साधला, त्यांच्या समाजोपयोगी कार्य व कर्तव्यनिष्ठेचे मनापासून कौतुक केले. 

संगमनेर शहराला सुसंस्कृत राजकारणाची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. सर्व समाजघटक गुण्यागोविंदाने नांदणारे हे शहर एक कुटुंब असल्याची भावना जपत ही परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी नव्या पदाधिकाऱ्यांची आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत राहून प्रामाणिकपणे जनसेवा करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Comments

No comments yet.