नाशिक, (प्रतिनिधी) २२ डिसेंबर - नाशिक - पुणे रेल्वे नाशिक - सिन्नर - संगमनेर - अकोले - नारायणगाव - राजगुरुनगर - चाकण या मार्गेच गेली पाहिजे अशी आपली ठाम मागणी आहे. यासाठी आपल्या जनआंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याच्या उद्देशाने आज या मार्गात येणाऱ्या सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली.
नाशिक- शिर्डी रेल्वे मार्ग, अहिल्यानगर - पुणे रेल्वे मार्ग या प्रकल्पांनाही आमचा पाठिंबा आहे. पण, नाशिक व पुणे या दोन औद्योगिक शहरांच्या विकासासाठी, या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्तम वाहतुकीच्या व्यवस्थेसाठी, या भागातील विद्यार्थी व नोकरदार वर्गाच्या हितासाठी नाशिक - पुणे रेल्वे पूर्वीच्या आराखड्याप्रमाणे सरळ मार्गे होणे अत्यंत गरजेचे आहे. या दिशेने काम सुरू होऊन जवळपास 1000 कोटी रुपये खर्च करून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहणही झालेले आहेत. आता इथून माघार न घेता रेल्वे प्रकल्प सरळमार्गे व्हावा यासाठी या मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधी, विविध तालुक्यातील रेल्वे कृती समितीचे प्रतिनिधी यांची आज विचार मंथन बैठक संपन्न झाली. या बैठकीत जन आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात आली.
आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आम्ही सर्व प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन आमची भूमिका मांडणार आहोत. यासाठी आजच्या बैठकीतूनच मी माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत फोनवरून चर्चा केली, त्यांनी आमच्या शिष्टमंडळाला जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटीसाठी वेळ देण्याबाबत आश्वस्त केले आहे.
या बैठकीत ऑनलाईन माध्यमातून डॉ. अमोल कोल्हे त्याचप्रमाणे खा. राजाभाऊ वाजे, खा. भाऊसाहेब वाकचौरे, मा.खा. शिवाजीराव आढळराव पाटील, मा.खा. सदाशिवराव लोखंडे, आ. शरद सोनवणे, आ. किरण लहामटे, आ. बाबाजी काळे, मा.आ. अतुल बेनके, श्री. देवदत्त निकम, श्री. सत्यशील शेरकर, सौ. नीलम अमोल खताळ, मा. उत्कर्षा रूपवते, मा. उदय सांगळे, कॉ. अजित नवले, कॉ. कारभारी नवले, मा. बाजीराव दराडे, मा. कपिल पवार, मा. दत्ता ढगे यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित होते.