अबब! लेफ्टनंट कर्नलकडे सापडले एवढे मोठे घबाड...सीबीआयची मोठी कारवाई...

Share:
Main Image
Last updated: 21-Dec-2025

नवी दिल्ली, दि. २१ डिसेंबर - एका कारवाईत सीबीआयने संरक्षण उत्पादन विभागातील लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मा याला ३ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे लष्करी आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणात शर्मा याच्या पत्नीसह एका आंतरराष्ट्रीय कंपनीचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. ही कारवाई शनिवारी करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, शर्मा याच्या दिल्लीतील निवासस्थानी घेतलेल्या झडतीत, सीबीआयने लाच म्हणून घेतलेले तीन लाख जप्त केले. दिल्लीतील कार्यालयातही अद्याप झडती सुरू असून, काही महत्त्वाच्या फाईल्स ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

संरक्षण उत्पादन विभागात आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि निर्यात विभागाचा उप नियोजन अधिकारी म्हणून काम करणारा दीपककुमार शर्मा आणि श्री गंगानगर, राजस्थान येथील १६व्या इन्फंट्री डिव्हिजन ऑर्डनन्स युनिटची कमांडिंग ऑफिसर असलेली त्याची पत्नी, कर्नल काजल बाली यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. शर्मा आणि फिर्यादी विनोद कुमार यांना शनिवारी दिल्लीतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांना २३ डिसेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे सीबीआयने म्हटले आहे.

संरक्षण उत्पादने आणि त्यांची निर्यात करणाऱ्या विविध खासगी कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत कट रचून शर्मा भ्रष्ट आणि बेकायदेशीर कृत्यांमध्ये सामील असल्याचा आरोप सीबीआयच्या प्रवक्त्याने एका निवेदनात केला आहे. बेंगळुरू येथील अशाच एका कंपनीकडून शर्मा याला लाच देण्याच आल्याची माहिती सीबीआयला मिळाल्यानंतर सीबीआयने त्याच्या दिल्लीतील निवासस्थानी झडती घेतली. तिथून २.२३ कोटी रुपयांची रोख रक्कम आणि लाच म्हणून मिळालेले तीन लाख रुपये सीबीआयने जप्त केले. तर, काजल बाली हिच्या श्री गंगानगर येथील घरातून दहा लाख रुपये जप्त करण्यात आल्याचे सीबीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मा हे संरक्षण मंत्रालयांतर्गत संरक्षण उत्पादन विभागात कार्यरत आहेत. खासगी कंपन्यांना संरक्षण उत्पादनांची निर्मिती आणि निर्यातीसाठी नियमबाह्य मदत करणे आणि त्यांना सरकारकडून नियमबाह्य लाभ मिळवून देणे, असा गंभीर आरोप शर्मावर आहे. 

सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरनुसार या कटात केवळ दीपक कुमार शर्माच नाही, तर त्याची पत्नी कर्नल काजल बाली आणि दुबईस्थित एका कंपनीचाही समावेश आहे. बेंगळुरूमध्ये राहणारे राजीव यादव आणि रवजित सिंह हे या कंपनीचे भारतातील कामकाज पाहतात. हे दोघेही शर्मा यांच्या संपर्कात होते. कंपनीच्या सूचनेनुसार १८ डिसेंबर रोजी विनोद कुमार नावाच्या व्यक्तीने ३ लाख रुपयांची लाच लेफ्टनंट कर्नल शर्मा याच्याकडे सोपवली आणि तिथेच सीबीआयने सापळा रचून ही कारवाई केली. या अटकेनंतर सीबीआयने दिल्ली, बेंगळुरू, जम्मू आणि श्रीगंगानगरसह अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवली आहे. या छापेमारीत हाती लागलेली मालमत्ता थक्क करणारी आहे.

Comments

No comments yet.