ते देतायत एकमेकांना सौभाग्याचं शपथपत्र... काय आहे हा अनोखा उपक्रम... राज्यभरात चर्चा...

Share:
Main Image
Last updated: 21-Dec-2025

नाशिक, दि. २१ डिसेंबर (प्रतिनिधी) - समाजात महिलांवर, विशेषतः पतीच्या निधनानंतर लादल्या जाणाऱ्या अमानवी, अवैज्ञानिक व अन्यायकारक प्रथा नाकारत स्त्रीसन्मान, समानता व मानवी हक्कांचे मूल्य अधोरेखित करणारा ‘सौभाग्याचं शपथपत्र’ हा अभिनव उपक्रम जिल्हा परिषद नाशिकच्या ‘नवचेतना अभियान’ अंतर्गत यशस्वीपणे राबविण्यात येत असून, या उपक्रमाला विविध स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

या शपथपत्रात पतीच्या निधनानंतर महिलांवर लादल्या जाणाऱ्या मंगळसूत्र काढणे, कुंकू पुसणे, जोडवे काढणे, विशिष्ट रंग व वस्त्रांवरील निर्बंध तसेच सामाजिक व धार्मिक बंधने या सर्व प्रथा अन्यायकारक असून न पाळण्याचा निर्धार करीत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नाशिक तालुक्यातील चांदशी ग्रामपंचायत अंतर्गत विविध धर्मीय २० पती-पत्नींनी स्वेच्छेने सहभाग घेत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.

तर सिन्नर तालुक्यातील गुळवंच ग्रामपंचायतीने जनजागृती सुरू केली असुन माध्यमिक विद्यालय गुळवंच येथील २६७ विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांकडून ‘सौभाग्याचं शपथपत्र’ भरून आणत या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरपंच भाऊदास शिरसाठ, मुख्याध्यापक श्री. काळे व ग्रामपंचायत अधिकारी संजय गिरी यांनी विशेष परिश्रम घेतले.

‘नवचेतना अभियान’ अंतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि समाजातील विचारप्रवाह बदलण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

Comments

No comments yet.