हुश्श...‘महाटीईटी-२०२५’ची अंतरिम उत्तरसूची जाहीर... येथे पहा...

Share:
Main Image
Last updated: 20-Dec-2025

पुणे, (प्रतिनिधी) दि.२० डिसेंबर - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-२०२५’ची (MAHATET) अंतरिम उत्तरसूची जाहीर करण्यात आली असून, उमेदवारांना यावर २७ डिसेंबर २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने आक्षेप नोंदविता येणार आहेत. ही उत्तरसूची परिषदेच्या https://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

राज्यात २३ नोव्हेंबर २०२५ रोजी पेपर १ आणि पेपर २ साठी ही परीक्षा घेण्यात आली होती. या दोन्ही पेपरची अंतरिम उत्तरसूची १९ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत उमेदवारांना त्रुटी आढळल्यास, त्या पुराव्यासहित सादर करण्यासाठी २७ डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. उमेदवारांनी संकेतस्थळावर त्यांच्या ‘लॉगीन’मध्ये उपलब्ध करून दिलेल्या ‘आक्षेप नोंदणी’ या लिंकद्वारेच आपले आक्षेप नोंदवायचे आहेत.

आक्षेप नोंदविताना केवळ ऑनलाईन पद्धतीचाच स्वीकार केला जाणार असून टपाल, ईमेल किंवा समक्ष सादर केलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन आक्षेपांवर विषय तज्ज्ञांचा अभिप्राय घेऊन त्यानंतरच अंतिम उत्तरसूची यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल,असेही कळविण्यात आले आहे.

Comments

No comments yet.