नाशिक जिल्हाधिकाऱ्यांची मध्यवर्ती कारागृहाला अचानक भेट...

Share:
Main Image
Last updated: 20-Dec-2025

नाशिक, (प्रतिनिधी) दिनांक १९ डिसेंबर - जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज नाशिक मध्यवर्ती कारागृहास भेट देऊन कारागृहातील विविध विभागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यसैनिक व थोर समाजसुधारक साने गुरुजी यांनी कारावास भोगलेल्या बॅरकला भेट देऊन त्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा कारागृह अधीक्षक अरूणा मुगुटवार उपस्थित होत्या. 
नाशिक मध्यवर्ती कारागृहाचा ऐतिहासिक वारसा लक्षात घेता, या कारागृहाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका बजावली आहे. साने गुरुजी यांचा कारावास हा या कारागृहाच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी नमूद केले.
नाशिक मध्यवर्ती कारागृह २०२७ साली स्थापनेची १०० वर्षे पूर्ण करणार असून, त्या अनुषंगाने कारागृह अधिक सक्षम, आधुनिक व आदर्श सुधारगृह म्हणून विकसित करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. सध्या कारागृहातील व्यवस्था समाधानकारक असून त्यात अधिक वाढ करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
कैद्यांच्या सुधारणा व पुनर्वसनाच्या दृष्टीने शिक्षण, कौशल्यविकास, आरोग्य सुविधा, स्वच्छता, मानसिक समुपदेशन तसेच विविध सुधारात्मक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कारागृह प्रशासनाच्या कामकाजाचा दर्जा अधिकाधिक सुधारण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावरून नियमित आढावा घेण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून नाशिक मध्यवर्ती कारागृह देशातील आदर्श सुधारगृह म्हणून नावारूपास आणण्याचे प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी कारागृह अधीक्षक श्रीमती अरूणा मुगुटवार यांनी कारागृहातील सोईसुविधा, सद्यपरिस्थिती तसेच उपक्रमांची माहिती दिली. तसेच कारागृहातील बंदीवानाना अधिक सुविधा देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली.

Comments

No comments yet.