नाशिक, (प्रतिनिधी) १५ जानेवारी - नाशिकचा डावखुरा फिरकी गोलंदाज व उपयुक्त फलंदाज नील चंद्रात्रे याने बी सी सी आयच्या १६ वर्षांखालील विजय मर्चंट ट्रॉफी स्पर्धेत मध्य प्रदेश विरुद्ध उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात ४ बळी घेत महाराष्ट्र संघाला उपांत्य फेरीत नेण्यात उपयुक्त कामगिरी बजावली.
नडियाद येथे झालेल्या चार दिवसीय कसोटी सामन्यात महाराष्ट्र संघातर्फे नील चंद्रात्रेने फलंदाजीत पहिल्या डावात सातव्या क्रमांकावर खेळत ३८ धावा करून महाराष्ट्र संघाला साडेतीनशे पार नेले. त्यानंतर मध्य प्रदेशच्या पहिल्या डावात २ गडी बाद करत महाराष्ट्र संघाला १६७ धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. नीलने दुसऱ्या डावातही २ गडी बाद करत सामन्यात एकूण ४ बळी घेतले.
उपांत्य फेरीत महाराष्ट्र संघाचा सामना आसाम विरुद्ध १८ ते २१ जानेवारी दरम्यान निरंजन शाह स्टेडियम, राजकोट येथे होणार आहे.
संक्षिप्त धावफलक व निकाल -
महाराष्ट्र पहिला डाव ३५८ - प्रज्वल मोरे १०१ , राघव नाईक ७३ व नील चंद्रात्रे नाबाद ३८ व दुसरा डाव ३२२ - एकनाथ देवडे नाबाद १२५ , ओम पाटील ६७.
वि.
मध्य प्रदेश पहिला डाव - १९१ - अर्णव घोडगावकर ६३. अर्जुन गायकवाड ६ व नील चंद्रात्रे २ बळी व दुसरा डाव ५ बाद १५९ - कुशाग्र नागर ८४. नील चंद्रात्रे २ बळी.
-सामना अनिर्णित - महाराष्ट्र संघाला पहिल्या डावातील आघाडीचे गुण व उपांत्य फेरीसाठी पात्र.
बीसीसीआयच्या राष्ट्रीय पातळीवरील या महत्वाच्या स्पर्धेत नील चंद्रात्रेने उपयुक्त कामगिरी केल्याबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा व सेक्रेटरी समीर रकटे यांनी त्याचे अभिनंदन करत उपांत्य फेरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.