नाशिक, (प्रतिनिधी) १५ जानेवारी - चांगला शेजार लाभणं, ही नशिबाची गोष्ट असते, असं म्हणतात. ते किती महत्त्वाचं आहे, हे नाशिकमधील दोन घटनांवरून समोर आलं आहे.
परप्रांतीय महिलेच्या घरात घुसून शेजाऱ्याने दागिने हिसकावून नेल्याची घटना मखमलाबाद शिवारातील विद्यानगर भागात घडली. या घटनेत भामट्याने मंगळसुत्रासह सोन्याची नथ असा सुमारे ४० हजाराचे अलंकार बळजबरीने काढून पोबारा केला असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मुन्ना प्रकाश मिसाळ असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
परप्रांतीय २५ वर्षीय विवाहितेने याबाबत फिर्याद दिली आहे. राहूलनगर नाला भागात राहणारी महिला बुधवारी (दि.१४) सायंकाळच्या सुमारास आपल्या घरात एकटी होती. रो हाऊसचा पाठीमागील दरवाजा कोणी तरी वाजविल्याने तिने दरवाजा उघडला असता ही घटना घडली. दरवाजा उघडताच संशयिताने महिलेचे तोंड दाबून ही लुटमार केली. धाकदडपशा दाखवत भामट्याने बळजबरीने महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र आणि नाकातील नथ असे ४० हजार रूपये किमतीचे अलंकार काढून घेत पोबारा केला आहे. पिडीतेचा पती कामावरून घरी परतल्यानंतर तिने आपबिती कथन केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून या गुह्याचा तपास उपनिरीक्षक गावीत करीत आहेत.
नाशिक : शेजाऱ्यांच्या जाचास कंटाळून ६३ वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मृत जेष्ठ नागरिकाने विषारी औषध सेवन करून आपले जीवन संपविले असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात एकाच कुटूंबातील चार जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लॉरेन्स यवाना शिरसाठ, अनिता लॉरेन्स शिरसाठ, प्रियेश लॉरेन्स शिरसाठ व वेरोनिका नामक महिला अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. मालिनी विवेक वाघमारे (रा.रोझा कॉलनी,मोटवाणीरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मालिनी यांचे पती विवेक रूंजाजी वाघमारे (६३) यांनी गेल्या गुरूवारी (दि.८) रात्री अकरा वाजेच्या सुमारास शेजाऱ्यांच्या जाचास कंटाळून विषारी औषध सेवन केले होते. जुन्या भांडणाची कुरापत काढून संशयित वारंवार त्रास देत असल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे. संशयितांच्या मानसिक व शारिरीक जाचास कंटाळून वाघमारे यांनी विषारी औषध सेवन केले होते. कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता बुधवारी (दि.१४) उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. या मृत्यूस शिरसाठ कुटुंबीय जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक हरसिंग पावरा करीत आहेत.