नाशिक, (प्रतिनिधी) दि. १४ जानेवारी २०२६ - नाशिक शहर पोलीस आयुक्तांच्या दालनात एका परराज्यातील हायप्रोफाइल भोंदूबाबाने चमत्काराचा दावा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, या तथाकथित चमत्काराला पोलीस आयुक्तांनी हात जोडून नमस्कार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) पोलीस महासंचालकांकडे धाव घेत संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
उत्तर प्रदेशातील बरेली येथील 'मनौना धाम'चा तथाकथित भोंदू ओमेंद्र चौहान हा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. हा बाबा बाटलीतील 'मंतरलेले पाणी' देऊन कॅन्सरसारखे गंभीर आजार बरे करणे, मृत व्यक्तीला जिवंत करणे आणि मनोविकारातून मुक्ती मिळवून देण्याचे अवैज्ञानिक दावे करतो. नाशिकमधील एका आलिशान हॉटेलमध्ये त्याने अशाच प्रकारचे दावे करून रुग्णांची दिशाभूल केल्याच्या चित्रफिती उपलब्ध आहेत.
आयुक्तांच्या दालनात 'चमत्कार'
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, नाशिक शहर पोलीस आयुक्तांच्या शासकीय दालनात हा 'बोतलवाला बाबा' पोहोचला. तेथे त्याने बाटलीतील पाण्यावर मंत्र पुटपुटून तथाकथित चमत्कार दाखवला. यावेळी पोलीस आयुक्तांनी त्याला हात जोडून नमस्कार केला. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ स्वतः भोंदूबाबाने आपल्या इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाउंटवर प्रसारित केला आहे. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यानेच अशा भोंदूगिरीला मूक संमती दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
'अंनिस' आक्रमक
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणाचा तीव्र निषेध केला आहे. समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे आणि डॉ. टी. आर. गोराणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस महासंचालक सदानंद दाते व विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनातील प्रमुख मुद्दे:
ज्यांनी जादूटोणाविरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करायची, त्यांनीच भोंदूबाबांना शासकीय कार्यालयात मानाचे स्थान देणे हे गंभीर आहे.
एका भोंदूबाबास त्र्यंबकेश्वर येथे सरकारी प्रोटोकॉलनुसार पोलीस संरक्षण का देण्यात आले?
ओमेंद्र चौहान याच्यावर आणि त्याला आश्रय देणाऱ्या सर्व जबाबदार व्यक्तींवर जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा.
"ज्या कायद्यासाठी अंनिसने १८ वर्षे लढा दिला, त्या कायद्याचे रक्षकच जर अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत असतील, तर ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे."
या निवेदनावर डॉ. टी. आर. गोराणे, कृष्णा चांदगुडे, प्रा. डॉ. सुदेश घोडेराव, प्रा. आशा लांडगे, महेंद्र दातरांगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. आता या प्रकरणावर गृह विभाग आणि पोलीस महासंचालक काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.