नाशिक, (प्रतिनिधी) १४ जानेवारी - मोबाईल हिसकावण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वारांनी पादचाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर भागात घडला. या घटनेत ४६ वर्षीय पादचारी जखमी झाला असून, या घटनेची दखल घेत पोलीसांनी एका सराईतासह त्याच्या साथीदारास अटक केली आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिक राजेश हेकडी (२५ रा. पुष्पक पार्क शनि चौक,श्रमिकनगर) व सोनू अरूण आहिरे (२० रा.माळी कॉलनी श्रमिकनगर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून त्यातील प्रतिक हेकडी हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. प्रविण रूपचंद वसईकर (४६ रा. अमृत गार्डन समोर समृध्दनगर सातपूर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
वसईकर रविवारी (दि.११) जेवण आटोपून घर परिसरात फोनवर बोलत फेरफटका मारत असतांना ही घटना घडली. रात्री ११ वाजेच्या सुमारास ते अमृत चौकातील साईनाथ कलेक्शन दुकानासमोरून फोनवर बोलत रस्त्याने पायी जात असतांना मोपेड दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र वसईकर यांनी प्रसंगावधान राखत प्रतिकार केल्याने ही घटना घडली.
संतप्त दुकलीपैकी एकाने वसई यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेत त्यांच्या डोक्यावर व हातावर वार करण्यात आला असून त्यात उजव्या हाताच्या करंगळी जवळील बोटाचे पेरे कट झाले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या असून या गुह्याचा तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.
बसच्या धडकेत पाय मोडला
भरधाव बसने धडक दिल्याने ३० वर्षीय परप्रांतीय तरूण जखमी झाला. या अपघातात पायावर चाक गेल्याने तरूणाचा पाय मोडला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल श्रीकृष्ण ठाकुर (मूळ रा. बिहार हल्ली आरडी सर्कल,गोविंदनगर) असे जखमी परप्रांतीयाचे नाव आहे. ठाकूर गेल्या बुधवारी (दि.७) शालिमार भागात कपडे खरेदीसाठी गेला होता. सायंकाळच्या सुमारास तो घराकडे परतत असतांना हा अपघात झाला.
त्र्यंबक नाका भागातील वर्दळीच्या मेहता पेट्रोल पंपा समोरील रस्ता ओलांडत असतांना त्यास गडकरी चौकाच्या दिशेने जाणाºया एमएच १४ एल एक्स ८७५९ या बसचा धक्का लागला. या अपघातात बसचे चाक पायावरून गेल्याने त्याचा पाय मोडला असून या गुह्याचा तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.