मकर संक्रांत म्हणजे काय? वाण का देतात? घ्या जाणून सविस्तर...

Share:
Main Image
Last updated: 14-Jan-2026

मनुष्य हा उत्सव प्रिय प्राणी आहे. विविध उत्सवांच्या माध्यमातून तो आपल्या मनातील भाव व्यक्त करत असतो. हिंदू धर्मात विविध उत्सवांच्या माध्यमातून केवळ धार्मिकताच दर्शविली जात नाही, तर प्रत्येक उत्सव, सण आणि व्रत हे मनुष्याला निसर्गाच्या अधिक जवळ नेणारे आहेत. त्यातीलच एक म्हणजे मकर संक्रांत. हा प्राकृतिक उत्सव आहे, म्हणजे प्रकृतीशी ताळमेळ साधणारा उत्सव. दक्षिण भारतात हे पर्व ‘थई पोंगल’ नावाने ओळखले जाते. सिंधी लोक या पर्वाला ‘तिरमौरी’ म्हणतात. महाराष्ट्रात तसेच हिंदी भाषिक ‘मकर संक्रांत’ म्हणतात आणि गुजरातमध्ये हे पर्व ‘उत्तरायण’ नावाने ओळखले जाते.

मकर संक्रांतीचा काळ : मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जण ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून हेवेदावे विसरून मनाने जवळ येतात. इतर सणांप्रमाणे हा सण तिथीवाचक नाही. सध्या मकर संक्रांतीचा दिवस १४ जानेवारी हा आहे. सूर्यभ्रमणामुळे पडणारे अंतर भरून काढण्यासाठी क्वचित प्रसंगी संक्रांत एक दिवसाने पुढे ढकलली जाते म्हणजे १५ जानेवारीला असते. २०२६ मध्ये मकर संक्रांत १४ जानेवारीला आहे. हिंदु धर्मात संक्रांतीला देवता मानले आहे. संक्रांतीने संकरासुर दैत्याचा वध केला, अशी कथा आहे. संक्रांतीच्या दुसर्‍या दिवसाला किंक्रांत अथवा करिदिन असे म्हटले जाते. या दिवशी देवीने किंकरासुराला ठार मारले.

मकर संक्रांतीचे महत्त्व : या दिवशी सूर्याचे उत्तरायण चालू होते. या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत वातावरण अधिक चैतन्यमय असल्याने साधना करणाऱ्याला या चैतन्याचा लाभ होतो. कर्क संक्रांती पासून मकर संक्रांती पर्यंतच्या काळाला ‘दक्षिणायन’ म्हणतात. दक्षिणायनापेक्षा उत्तरायणात मरण येणे अधिक चांगले समजले जाते.

मकर संक्रांतीच्या पर्वकाळात दान देण्याचे महत्व ! : मकर संक्रांत ते रथसप्तमी पर्यंतचा काळ हा पर्वकाळ असतो. या वेळी केलेली पुण्य कर्मे विशेष फलद्रूप होतात. धर्मशास्त्रानुसार या काळात दान, जप, धार्मिक अनुष्ठान यांचे अत्यंत महत्त्व आहे. या काळात दिलेले दान पुनर्जन्म झाल्यानंतर शंभरपटीने प्राप्त होते अशी मान्यता आहे.

हळदी-कुंकू करण्याचे महत्त्व :

मकर संक्रांत ते रथ सप्तमी हळदीकुंकू समारंभ केले जातात. मकर संक्रांतीला ब्रह्मांडाची चंद्रनाडी कार्यरत असते. सूर्याच्या उत्तरायणामध्ये ब्रह्मांडात रज-सत्त्व लहरी अधिक असतात. अशा पोषक काळामध्ये हळदीकुंकू करणे हे लाभदायक असते. या माध्यमातून  सुवासिनींच्या रूपात घरी आलेल्या साक्षात् आदिशक्तीचीच पूजा करत असतो. 

वाण देणे :

‘नवे भांडे, वस्त्र, अन्न, तीळ, तीळपात्र, गूळ, गाय, घोडा, सोने किंवा भूमी यांचे यथाशक्ती दान द्यावे असे शास्त्रात सांगितले आहे. मकर संक्रांती निमित्त सुवासिनी हळदी  कुंकवाचा कार्यक्रम करून जे दान देतात, त्याला ‘वाण देणे’ असे म्हणतात. काही पदार्थ सुवासिनी कुमारिकांकडून लुटतात आणि तीळगूळ देतात.’ आजकाल अधार्मिक वस्तूंचे वाण देण्याची चुकीची प्रथा पडली आहे. वाणात देण्यात येणाऱ्या वस्तु सात्विक असाव्या. सात्त्विक वाण देणे, हा धर्मप्रसारच असून त्यामुळे ईश्वरीकृपा होते. या वस्तूंमध्ये सौभाग्याच्या वस्तू, उदबत्ती, उटणे, धार्मिक ग्रंथ, पोथ्या, देवतांची चित्रे इत्यादी अध्यात्माला पूरक अशा वस्तूंचे वाण द्यावे.

सुगड वाण  देणे :

मकर संक्रांतीच्या सणाला ‘सुगड्याचे’ वाण देतात. सुगड म्हणजे मातीचे छोटा घट. सुगड्यांना हळदी-कुंकवाची बोटे लावून दोरा गुंडाळतात. त्यात गाजर, बोरे, उसाची पेरे (कांड्या), वाटाणा आणि वालाच्या शेंगा, कापूस, हरभरे, तीळगूळ, हळदी-कुंकू इत्यादी घालून पाट मांडून त्याच्या भोवती रांगोळी काढतात, त्या पाटावर ही पाच सुगडे ठेवतात. त्यांचे पूजन करतात. त्यातील तीन सुगडी सवाष्णींना दान (वाण) देतात, एक सुगड तुळशीला आणि एक स्वतः करिता ठेवतात.

मकर संक्रांतीच्या काळात तीर्थस्नान करण्याचे महत्व : या काळात तीर्थस्नान केल्याने महापुण्य मिळणे. मकरसंक्रांतीला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पुण्यकाळ असतो. या काळात गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या नद्यांच्या काठी असलेल्या क्षेत्रावर स्नान करणार्‍यास महापुण्य लाभते.

तीळगुळ ‍वाटणे : तीळगुळाचे सेवन केल्याने अंतर्शुद्धी होऊन साधना चांगली होते. इतरांना तीळगूळ देण्यापूर्वी देवासमोर ठेवल्याने तो प्रसाद होतो, त्यातील शक्ती व चैतन्य टिकून रहाते. समोरच्याला तिळगुळ दिल्यावर त्याच्यातील प्रेमभाव आणि सकारात्मकता वाढते.

बाळाचे बोरन्हाण : मूल जन्माला आल्यानंतर प्रथम येणार्‍या मकर संक्रांतीच्या दिवशी आप्‍तेष्टांच्या लहान मुलांना बोलावून हा समारंभ करतात. त्यासाठी बाळाला झबले शिवतात. त्यावर खडी काढतात किंवा हलव्याचे दाणे बसवतात. बाळाच्या अंगावर हलव्याचे दागिने घालतात. प्रथम औक्षण करून बाळाच्या मस्तकावर बोरे, उसाचे करवे, भुईमुगाच्या शेंगा व चुरमुरे हे सर्व पदार्थ एकत्र करून ओततात. यालाच बोरन्हाण म्हणतात. इतर मुले खाली पडलेले हे पदार्थ वेचून खातात. मग सुवासिनींना हळदी-कुंकू देतात. बोरन्हाण घातल्याने मुलाला पुढच्या उन्हाळ्याची बाधा होत नाही व त्याचे आरोग्य चांगले रहाते, असे समजतात. हा संस्कार मुख्यत: महाराष्ट्रात प्रचलित आहे.

Comments

No comments yet.