अजित पवारांचे सल्लागार नरेश अरोरांच्या कार्यालयावर छापा... अजित पवार म्हणाले...

Share:
Main Image
Last updated: 14-Jan-2026

पुणे, (प्रतिनिधी) १४ जानेवारी - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार आणि प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार नरेश अरोरा यांच्या पुण्यातील वाकडेवाडी येथील कार्यालयावर आज पुणे पोलिसांनी कारवाई केली. एका तोंडी तक्रारीची शहानिशा करण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक 'डिझाईन बॉक्स'  या कंपनीच्या कार्यालयात पोहोचले होते. या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर अधिकृत प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

नेमकी कारवाई काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला 'डिझाईन बॉक्स' कंपनीच्या विरोधात एक तक्रार प्राप्त झाली होती. विशेष म्हणजे ही तक्रार लेखी नसून केवळ तोंडी स्वरूपाची होती. या तक्रारीच्या अनुषंगाने काही माहिती मिळवण्यासाठी आणि शहानिशा करण्यासाठी पोलीस पथक वाकडेवाडी येथील कार्यालयात गेले होते. काही वेळ चाललेल्या या चौकशीनंतर पोलिसांनी आपली प्रक्रिया पूर्ण केली.

अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ आपली भूमिका मांडली. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी कार्यरत असलेले श्री. नरेश अरोरा व त्यांची संस्था 'डिझाईनबॉक्स्ड' यांच्या पुणे कार्यालयात आज क्राईम ब्रँचचे काही अधिकारी माहिती घेण्याच्या उद्देशाने आले होते. संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रक्रियेदरम्यान त्यांना आवश्यक ती सर्व माहिती देण्यात आली असून संपूर्ण सहकार्य करण्यात आले आहे," असे पवार यांनी स्पष्ट केले.

'काहीही आक्षेपार्ह आढळले नाही'

या कारवाईत कोणतीही अनियमितता आढळली नसल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. ते म्हणाले की, "या प्रक्रियेत कोणतीही आक्षेपार्ह बाब किंवा कोणतीही अनियमितता आढळून आलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायद्याचा सन्मान करतो आणि सर्व वैधानिक प्रक्रियांना सहकार्य करण्यावर आमचा विश्वास आहे."

पक्षाचा नरेश अरोरांना खंबीर पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या कठीण काळात नरेश अरोरा आणि त्यांच्या संस्थेच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचेही पवारांनी नमूद केले. "या विषयावर कोणताही संभ्रम, अफवा किंवा अनावश्यक 'नैरेटिव्ह' पसरवू नये. तथ्यांच्या आधारेच कोणताही निष्कर्ष काढावा, हीच आमची भूमिका आहे," असे आवाहन त्यांनी प्रसारमाध्यमे आणि नागरिकांना केले आहे.

Comments

No comments yet.