मुंबई, (प्रतिनिधी) दि. १३ जानेवारी २०२६ - राज्यातील लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची बहुप्रतीक्षित घोषणा अखेर आज झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन पहिल्या टप्प्यात राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या १५ फेब्रुवारीपर्यंतच्या मुदतीचे पालन करत आयोगाने ५ फेब्रुवारीला मतदानाचा दिवस निश्चित केला आहे.
१२ जिल्ह्यांत निवडणुकांचा धुराळा
राज्यातील एकूण ३६ पैकी ज्या १२ जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या आत आहे, तिथेच पहिल्या टप्प्यात निवडणुका घेतल्या जाणार आहेत. उर्वरित २० जिल्हा परिषदा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भवितव्याबाबत २१ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सुनावणीनंतरच इतर जिल्ह्यांच्या निवडणुकांचे चित्र स्पष्ट होईल.
इच्छुकांचा हिरमोड, राजकीय मोर्चेबांधणीला वेग
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या आणि सुनावणी प्रलंबित असलेल्या इतर २० जिल्ह्यांमधील इच्छुकांचा मात्र पुन्हा एकदा हिरमोड झाला आहे. मात्र, ज्या १२ जिल्ह्यांत निवडणुका जाहीर झाल्या आहेत, तिथे आजपासूनच आचारसंहिता लागू झाली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. १५ जानेवारीला राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका होत असतानाच आता जिल्हा परिषदांच्या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापले आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे लक्ष
इतर जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार, हे २१ जानेवारीच्या निकालावर अवलंबून असेल. फेब्रुवारी महिन्यात दहावी-बारावीच्या परीक्षा असल्याने, उर्वरित निवडणुका एप्रिल-मे महिन्यात जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
या जिल्हा परिषदांची निवडणूक जाहीर
लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी मतदारांना दोनदा मतदान करावे लागणार असून, यासाठी 1 जुलै 2025 ची यादी वापरली जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
असे आहे निवडणुकीचे वेळापत्रक:
|
टप्पा |
तारीख |
|
नामनिर्देशन पत्र दाखल करणे |
१६ जानेवारी ते २१ जानेवारी २०२६ |
|
अर्जांची छाननी |
२३ जानेवारी २०२६ |
|
अर्ज माघार आणि चिन्ह वाटप |
२७ जानेवारी २०२६ |
|
मतदान |
५ फेब्रुवारी २०२६ |
|
मतमोजणी आणि निकाल |
७ फेब्रुवारी २०२६ |