नाशिक, (प्रतिनिधी) १३ जानेवारी - भारतीय वायू दलातर्फे जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने २२ व २३ जानेवारी, २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या कालावधीत गंगापूर धरण परिसरात सूर्यकिरण हा एअर शो होणार आहे. त्यासाठी सर्व विभागांनी परस्परात समन्वय ठेवत सूक्ष्म नियोजन करून हा कार्यक्रम यशस्वी करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.
नाशिक येथे प्रथमच एअर शो होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी प्रसाद यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात सर्व विभागांकडून सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, पर्यटन विभागाचे उपसंचालक डॉ. नंदकुमार राऊत, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, उपजिल्हाधिकारी कुंदन हिरे, तहसिलदार पंकज पवार आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यानिमित्त नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी सतर्कता बाळगावी. शोच्या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधा, पाणी, स्वच्छता राहील याची दक्षता संबंधित विभागांनी घ्यावी. वाहनतळाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक नियुक्त करावेत. तेथे सपाटीकरण करून सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. शोसाठी येणाऱ्या नागरिकांना निश्चित केलेल्या ठिकाणी बैठक व्यवस्था करावी. त्यांच्या माहितीसाठी ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत. आवश्यक तेथे रस्त्यांची दुरुस्ती करून घ्यावी, अशाही सूचना जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिल्या.
निवासी उपजिल्हाधिकारी राजपूत यांनी सांगितले की, शोच्या ठिकाणी रस्ते दुरुस्तीचे काम सुरू असून मान्यवर तसेच नागरिक यांची बैठक व्यवस्था तयार करण्यात येत आहे. तसेच पिण्याचे पाणी, आरोग्य सेवेची उपलब्धता तसेच गर्दीचे नियोजन या कामांचे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.