नाशिक, (प्रतिनिधी) १३ जानेवारी - जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी आणि महिलांना सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी सामाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज केंद्र व राज्य शासनाच्या मागर्दशक सुचनांनुार बालविवाह मुक्त भारत/ महाराष्ट्र या संकल्प 100 दिवस अभियानांतर्गत दुपारी एकाच वेळी अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्रितपणे बालविवाह प्रथेचे समूळ उच्चाटन करण्याची शपथ घेतली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, सिद्धार्थ रामकुमार, तहसीलदार आबासाहेब तांबे, प्रदीप वर्पे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाने यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, खासगी आस्थापना, रूग्णालये, धार्मिक स्थळे, रेल्वे स्टेशन आणि बस स्थानके अशा सार्वजनिक ठिकाणीही हा उपक्रम राबविण्यात आला. मंगल कार्यालये, बँण्ड पथके, विवाह सेवा पुरवठादार आणि बचत गटनांही या मोहीमेत सक्रिय करण्यात आले आहे. बालविवाहासोबतच महिलांविरूद्ध होणारी हिंसा नष्ट करून त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची शपथ यावेळी घेण्यात आली. नागरिकांनी सदर शपथ शासनाच्या https://stopchildmarriage.wed.gov.in या लिंकवर भरून सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री दुसाणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.