नाशिक, (प्रतिनिधी) १३ जानेवारी - सिकलसेल हा अनुवंषिक आजार असला तरी वेळेवर तपासणी, नियमित उपचार व योग्य समुपदेशन व जनजागृतीच्या माध्यमातनून त्यावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे. शासानाच्या आरोग्य अभियांनांतर्गत जिल्ह्यात 15 ते 31 जानेवारी 2026 कालाधीत अरूणोदय सिकलसेल तपासणी पंधरवडा मोहीम राबविली जाणार आहे. नागरिकांनी या मोहिमेत मोफत तपासणी, उपचार करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे यांनी केले आहे.
राज्यात सिकलसेल आजाराचे अधिक प्रमाण असलेल्या 21 जिल्ह्यांमध्ये अरूणोदय विशेष सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडा मोहीम 15 ते 31 जानेवारी 2026 कालावधीत राबविण्यात येत आहे. सिकलसेल आजाराचे लवकर निदान, रूग्णांना योग्य उपचार व संदर्भसेवा उपलब्ध करून देणे व राज्यात एकही सिकलसेल रूग्ण तपासणीतून वंचित राहू नये, अशा सूचना आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या आहेत.
सिकलसेल ॲनेमिया हा रक्ताशी संबंधित अनुवंशिक आजार असून तो पालकांकडून मुलांमध्ये संक्रमित होतेा. या आजारात लाल रक्तपेशींचा आकार चंद्रकोर किंवा विळ्यासारखा (सिकल) होतो. परिणामी रक्तपेशींची लवचिकता कमी होवून रक्तभिसणात अडथळे निर्माण होतात व रूग्णांना तीव्र वेदना, अशक्तपणा व काही वेळेस रक्तस्त्रावासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
या मोहिमेंतर्गत आरोग्य विभागामार्फत रूग्णांची सिकलसेल ॲनिमियासाठी सोल्यूबिलीटी टेस्ट, इलेक्ट्रोफोरेसिस व एच.पी.एल.सी या अत्याधुनिक तपासण्या पूर्णत: मोफत केल्या जाणार आहेत. तसेच रूग्णांना फॉलिक ॲसिड, वेदनाशामक औषधे आवश्यकतेनुासर दिली जाणार असून गरज पडल्यास रक्तसंक्रमणाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. रूग्णाची आरोग्य तपासणी, औषोधोपचार, आहार मागदर्शन तसेच मानसिक समुपदेशन हा या कार्यक्रमाचा महत्वाचा भाग आहे. याबाबत अधिक माहितीसाठी जवळचे आरोग्यकेंद्र, आरोग्य सेविका, आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांच्याशी संपर्क साधावा. तसेच आरोय सल्ल्यासाठी टोल फ्री 104 क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही, डॉ. शिंदे यांनी केले आहे.