नाशिक, (प्रतिनिधी) दि. १२ जानेवारी २०२६ - नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उमेदवारी करणारे अमर श्रीराम वझरे यांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेतली असून, प्रभागातील नागरिकांकडून त्यांना मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रचार फेऱ्या, घरभेटी, बैठका आणि संवाद सभांमधून अमर वझरे यांनी मतदारांशी थेट संवाद साधत विकासाचा ठोस अजेंडा मांडला असून त्याला नागरिकांची सकारात्मक साथ मिळत आहे.
प्रभाग क्रमांक २४ मधील नागरिकांनी अमर वझरे यांच्यावर विश्वास व्यक्त करताना “तुम्हीच आमचे उमेदवार आणि तुम्हीच आमचे नगरसेवक” अशी भावना उघडपणे व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी प्रचार फेरी दरम्यान नागरिक स्वतःहून पुढे येत वझरे यांचे स्वागत करत असून, त्यांच्या कार्यपद्धतीवर, प्रामाणिकपणावर आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबतच्या भूमिकेवर समाधान व्यक्त करत आहेत.
अमर वझरे हे कायम लोकसंपर्कात राहणारे, सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेणारे आणि ते सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे उमेदवार म्हणून ओळखले जातात. पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, वाहतूक कोंडी, आरोग्य सेवा, तसेच युवक व महिलांसाठीच्या विकासात्मक योजनांबाबत त्यांनी स्पष्ट आणि व्यवहार्य भूमिका मांडली आहे. “केवळ आश्वासन नव्हे, तर प्रत्यक्ष काम” हेच आपले धोरण असल्याचे त्यांनी प्रचारादरम्यान ठामपणे सांगितले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ तसेच आमदार पंकज भुजबळ यांच्या नेतृत्वावर आणि विकासाच्या राजकारणावर प्रभागातील नागरिकांचा ठाम विश्वास आहे. याच विश्वासातून अमर वझरे यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम ते प्रभावीपणे करत आहेत.
प्रचारादरम्यान नागरिकांनी प्रभागातील प्रलंबित प्रश्न, मूलभूत सुविधांचा अभाव आणि मागील प्रतिनिधींनी केलेल्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त केली. या सर्व मुद्द्यांवर अमर वझरे यांनी ठोस उपाययोजना, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांच्या सहभागातून विकास साधण्याचे आश्वासन दिले. “निवडणूक जिंकल्यानंतरही मी तुमच्यातलाच राहीन, तुमच्या प्रश्नांसाठी नगरपालिकेत आवाज उठवीन,” असा विश्वास त्यांनी मतदारांना दिला.
सध्या प्रभाग क्रमांक २४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वातावरण चांगलेच अनुकूल असून, अमर वझरे यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस अधिक बळ मिळत आहे. वाढता जनसमर्थन, उत्स्फूर्त प्रतिसाद आणि विकासाच्या अजेंड्यावर मिळणारी साथ पाहता, येत्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २४ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.