कौशल्य प्रशिक्षण, सेंद्रिय भाजीपाला केंद्र आणि डिजिटल शाळांवर भर; प्रभाग २ मध्ये भाजपचा नवा चेहरा
नाशिक, (प्रतिनिधी) दि. १२ जानेवारी २०२६ - नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक २ मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार ऐश्वर्या लाड जेजुरकर यांनी आपला जाहीरनामा मतदारांसमोर मांडला आहे.
"वचनपूर्ती हे केवळ आश्वासन नसून आमची शपथ आहे," असे म्हणत त्यांनी प्रभागाच्या कायापालटासाठी एक सर्वसमावेशक 'रोडमॅप' सादर केला आहे. युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर त्यांनी विशेष भर दिला आहे.
युवकांसाठी प्रशिक्षण, विद्यार्थ्यांसाठी 'डिजिटल' शाळा
ऐश्वर्या लाड जेजुरकर यांनी शिक्षणाला सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. प्रभागातील महापालिका शाळांचे रूपडे बदलून त्या ठिकाणी 'डिजीटल क्लासरूम' आणि 'सीबीएसई' (CBSE) अभ्यासक्रम लागू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. याशिवाय:
- अभ्यासिका: स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि सुसज्ज वाचनालय सुरू करणे.
- कौशल्य केंद्र: युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी विशेष केंद्र स्थापन करणे.
- सांस्कृतिक केंद्र: कला आणि संस्कृतीच्या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत केंद्र विकसित करणे.

शेतकरी आणि ग्राहकांसाठी 'थेट बाजार'
मतदारसंघातील विविध भागांत सेंद्रिय भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्याचे महत्त्वाचे आश्वासन त्यांनी दिले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपला माल थेट विकण्याची संधी मिळेल आणि ग्राहकांना ताजा, विषमुक्त भाजीपाला उपलब्ध होईल. तसेच, व्यावसायिकांसाठी प्रभागात भव्य व्यापारी संकुलाची निर्मिती करण्याचा त्यांचा मानस आहे.
महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण
प्रभागात सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे सक्षम जाळे विणले जाईल. महिला बचत गटांना केवळ कर्जच नव्हे, तर त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी महिन्यातून एकदा विशेष प्रदर्शन भरवले जाईल. सार्वजनिक ठिकाणी महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र व स्वच्छ प्रसाधनगृहांची व्यवस्था करण्यावरही त्यांनी भर दिला आहे.
ज्येष्ठ नागरिकांचे विरंगुळा केंद्र आणि आरोग्य
वयोवृद्धांसाठी 'हास्य क्लब' आणि 'विरंगुळा केंद्र' सुरू करण्यात येईल. तसेच, प्रभागातील सर्व धार्मिक स्थळे, उद्याने आणि मैदानांची नियमित स्वच्छता राखली जाईल. पिण्याच्या पाण्याचा मुबलक पुरवठा आणि वीज व्यवस्था सुरळीत करण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणेशी समन्वय साधून ठोस कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी वचन दिले आहे.
अतिक्रमणमुक्त रस्ते आणि पारदर्शक प्रशासन
प्रभागातील मुख्य रस्त्यांना अतिक्रमणातून मुक्त करणे आणि खड्डेमुक्त काँक्रिट रस्ते साकारणे, हा त्यांच्या जाहीरनाम्याचा महत्त्वाचा भाग आहे. विशेष म्हणजे, प्रभागासाठी प्रामाणिकपणे झटणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांचा गौरव करून कामात पारदर्शकता आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
"प्रभाग २ मधील प्रत्येक नागरिकाचे जीवन सुखकर करणे, हेच माझे उद्दिष्ट आहे. १५ जानेवारीला कमळ या चिन्हासमोरील बटण दाबून मला आशीर्वाद द्या, मी प्रभागाचा कायापालट करून दाखवेन."
— ऐश्वर्या लाड जेजुरकर (उमेदवार, प्रभाग २, भाजप)
