नाशिक, (प्रतिनिधी) १२ जानेवारी - शहरातून मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असून वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या तीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. सदर मुलींना कुणीतरी पळवून नेल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याप्रकरणी अंबड व इंदिरानगर पोलीस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सिडकोतील सावता नगर भागात राहणारी अल्पवयीन मुलगी शनिवार (दि.१०) पासून बेपत्ता आहे. मैत्रीणी सोबत फिरण्यासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेली मुलगी अद्याप परतली नसून तिचे कुणी तरी अपहरण केल्याचा अंदाज कुटूंबियांनी वर्तविला आहे.
दुसरा प्रकार याच भागातील अश्विननगर परिसरात घडला. भाद्रपद सेक्टर मध्ये राहणारी अल्पवयीन मुलगी रविवारी (दि.११) घरात कुणीसही काही एक न सांगता कुठे तरी निघून गेली आहे. दिवसभर वाट बघूनही ती घरी न परतल्याने कुटूंबियांनी पोलीसात धाव घेतली आहे. तिलाही कुणी तरी पळवून नेल्याचा दावा कुटूंबियांनी केला आहे. दोन्ही घटनांप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या नोंदी करण्यात आल्या असून अधिक तपास उपनिरीक्षक उंडे व सहाय्यक निरीक्षक बागुल करीत आहेत.
तिसरी घटना वडाळा पाथडी रोडवरील गजानन महाराज नगर भागात घडली. या भागातील मुलगी शनिवारी (दि.१०) रात्री पासून बेपत्ता आहे. तिलाही कुणीतरी पळवून नेल्याचा अंदाज बांधण्यात आला असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार गांगुर्डे करीत आहेत.
दुचाकीस्वाराने केला विनयभंग
नाशिक : मुलास शाळेत सोडण्यासाठी पायी जाणाऱ्या महिलेचा दुचाकीस्वाराने पाठलाग करीत विनयभंग केल्याचा प्रकार द्वारका भागात घडला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रसाद काळे (रा.हरिहर कॉलनी,काठेगल्ली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पिडीतेने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी (दि.१०) सकाळच्या सुमारास ती लहान मुलास शाळेत सोडण्यासाठी जात असतांना हा प्रकार घडला. मुलास पायी घेवून जात असतांना दुचाकीवर पाठलाग करणाºया महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणाचा तपास हवालदार रेहरे करीत आहेत.