नाशिक, (प्रतिनिधी) १२ जानेवारी - भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिला जखमी झाला. हा अपघात मेरी लिंकरोड भागात झाला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात पसार झालेल्या कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंदा मधुकर भिसे (रा.बन्सीधर सोसा.राजराजेश्वरी मंगल कार्यालयाजवळ जेलरोड) असे जखमी दुचाकीस्वार महिलेचे नाव आहे. याबाबत मधुकर भिसे यांनी फिर्याद दिली आहे. भिसे या गेल्या गुरूवारी (दि.८) कामानिमित्त दिंंडोरीरोड भागात गेल्या होत्या. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्या परतीच्या प्रवासास लागल्या असता हा अपघात झाला. मेरी लिंकरोडने त्या आपल्या दुचाकीने घराकडे जात असतांना अक्षदा लॉन्स भागात समोरून भरधाव आलेल्या एका गाडीे त्यांच्या दुचाकीस धडक दिली. या अपघातात चंदा भिसे या जखमी झाल्या असून त्यांच्या दुकाचीचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर कारचालक आपल्या वाहनासह पसार झाला असून तपास हवालदार गोसावी करीत आहेत.
घराच्या बाल्कनीतून पडल्याने मृत्यू
नाशिक - राहत्या घराच्या बाल्कनीतून पडल्याने ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना रासबिहारी लिंक रोड या भागात घडली होती याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दिपकसिंग अर्जुनसिंग परदेशी (रा.चौधरी हॉस्पिटल, बळीमंदिर रासबिहारी लिंकरोड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. परदेशी १ जानेवारी रोजी बहुमजली इमारतीतील आपल्या घराच्या बाल्कनीत असतांनाअचानक तोल जाऊन ते जमिनीवर कोसळले होते. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने देवळाली कॅम्प येथील संतकृपा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मॅग्नम हॉस्पिटल येथे अधिक उपचारार्थ हलविण्यात आले असता उपचार सुरू असतांना डॉ. राहूल बिर्ला यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार कोरडे करीत आहेत.