नाशिक, (प्रतिनिधी) दि. १२ जानेवारी २०२६ - "प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नाशिक नगरी माझी कर्मभूमी आहे. नाशिकचे आणि माझे नाते गेल्या अडीच दशकांपासून अतूट आहे. आता आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा चेहरामोहरा बदलून या शहराला जागतिक दर्जाचे 'ब्रँड' बनवण्याचे माझे स्वप्न आहे," असा निर्धार राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्त प्रसिद्ध केलेल्या विशेष मनोगतातून त्यांनी नाशिककरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी 'भुजबळ पॅटर्न' म्हणजे नेमके काय, हे सांगतानाच भविष्यातील नियोजनाचा आराखडाही मांडला.
सिंहस्थ - विकासाची 'शाही' पर्वणी
येत्या दीड वर्षात नाशिकमध्ये जगप्रसिद्ध सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे. या सोहळ्याकडे केवळ धार्मिक कार्यक्रम म्हणून न पाहता ती नाशिकच्या प्रगतीची मोठी संधी असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले. "सिंहस्थ हा केवळ साधू-महंतांच्या शाहीस्नानाचा सोहळा नाही, तर तो नाशिकच्या पायाभूत विकासाचा महामार्ग आहे. हे शहर आपल्याला अशा प्रकारे नटवायचे आहे की, देशासह परदेशातील भाविक आणि पर्यटक येथे आकर्षित होतील," असे ते म्हणाले.

ओझर ते बोटक्लब
आपल्या कार्यकाळात झालेल्या कामांचा पाढा वाचताना त्यांनी विमानसेवेचा उल्लेख केला. "नाशिकमध्ये विमानसेवा सुरू व्हावी यासाठी आपण पॅसेंजर टर्मिनल विकसित केले, ज्याचा लाभ आज लाखो प्रवासी घेत आहेत. गंगापूर धरणावरील बोट क्लब, गंगापूर मेगा पर्यटन संकुल,कलाग्राम,नाशिक शहरासाठी अंतर्गत व बाह्य रिंगरोड आणि मुंबई-आग्रा महामार्गावरील देखणा उड्डाणपूल (नाशिकचा नेकलेस) ही सर्व कामे समीर भुजबळ, पंकज भुजबळ आणि आमच्या सहकाऱ्यांच्या मेहनतीचे फळ आहे," असे भुजबळ यांनी अभिमानाने सांगितले.
मनपात 'डिजिटल' क्रांती
नाशिककरांना महापालिकेच्या चकरा माराव्या लागू नयेत यासाठी कामकाज पूर्णपणे ऑनलाईन आणि पारदर्शक करण्याचा शब्द त्यांनी दिला आहे. "लोक मला म्हणतात 'भुजबळ म्हणजे विकासाचा पॅटर्न'. या विश्वासाला तडा जाऊ न देता नाशिकला देशातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्यासाठी मी कटिबद्ध आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले.
घड्याळ व धनुष्यबाण चिन्ह
सक्षम नेतृत्व आणि अनुभवी पक्षाच्या हाती महापालिकेची सत्ता देणे ही नाशिककरांची जबाबदारी असल्याचे सांगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना युतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. "पक्षाने अत्यंत विचारपूर्वक आणि सक्षम उमेदवार दिले आहेत. माझ्या हातांना बळ देण्यासाठी आणि विकासाची ही वाटचाल कायम ठेवण्यासाठी 'घड्याळ' व धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटण दाबून उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे," अशी आग्रहाची विनंती त्यांनी केली.
मंत्री भुजबळ यांचे ‘व्हिजन नाशिक’
नाशिक ब्रँडिंग: जागतिक नकाशावर नाशिकची नवी ओळख निर्माण करणे.
पायाभूत सुविधा: रस्ते चौपदरीकरण आणि उड्डाणपुलांचे जाळे अधिक विस्तारणे.
स्वच्छता: नाशिकला देशातील टॉप स्वच्छ शहरांच्या यादीत मानाचे स्थान मिळवून देणे.
पारदर्शकता: मनपा प्रशासन भ्रष्टाचारमुक्त आणि हायटेक करणे.