मालेगावकरांना हवा बदल... नवीन चेहऱ्यांनाच मिळणार मतदारांची पसंती...  

Share:
Main Image
Last updated: 12-Jan-2026

 

 

मालेगाव, (प्रतिनिधी) दि.१२ जानेवारी २०२६ - मालेगाव महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. मालेगावच्या सर्वांगीण विकासासाठी मालेगावकर नक्कीच या उमेदवारांना संधी देतील. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मालेगाव महानगरपालिकेचा विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्टार प्रचारक तथा माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मालेगाव येथील अग्रवाल भवनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व पुरस्कृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य बैठक पार पडली. यावेळी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना समीर भुजबळ बोलत होते.

 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मालेगाव तालुका अध्यक्ष किशोर इंगळे, शहराध्यक्ष विशाल सोनवणे,विधानसभा अध्यक्ष सतीश पवार, पूर्व तालुका अध्यक्ष रतनजी हलवर, नांदगाव विधानसभा अध्यक्ष विनोद शेलार, कार्याध्यक्ष आबासाहेब साळुंके, समाधान दुसाने, यांच्यासह मालेगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व पुरस्कृत उमेदवार सुषमा म्हसदे, कैलास तिसगे, सुमित मोरे, प्रियंका सोनवणे, भारती सैदाणे, बाळासाहेब आहिरे, दीपक बच्छाव, निर्मला गायकवाड,यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत गेल्या अनेक वर्षांपासून तेच तेच चेहरे निवडून येत असल्याने शहरातील अनेक महत्त्वाची विकासकामे रखडलेली आहेत. मालेगावच्या नागरिकांना आता बदल हवा असून, नवीन विचारांचे आणि प्रत्यक्ष काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेने नवीन व पुरस्कृत सक्षम उमेदवारांना संधी दिली असल्याचे ते म्हणाले.

 

ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून मालेगाव महानगरपालिकेसाठी भरीव आणि सर्वांगीण विकासकामे निश्चितच मार्गी लावली जातील. ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ताकदीने लढत असून जनतेचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारे गाफील न राहता एकजुटीने काम करावे. प्रामाणिक मेहनत आणि संघटित प्रचाराच्या जोरावर या निवडणुकीत आपल्याला निश्चितच चांगले यश मिळेल, असा विश्वासही माजी खासदार समीर भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला.

Comments

No comments yet.