श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुवर्णकलशारोहण समारंभ... गहिनीनाथ गडावर भाविकांचा अलोट सागर...

Share:
Main Image
Last updated: 11-Jan-2026

बीड, (प्रतिनिधी) ११ जानेवारी - समाजाला अध्यात्म, सदाचार आणि एकोप्याचा मार्ग दाखवणारे नाथ परंपरेतील महान श्री संत वामनभाऊ महाराज यांचे विचार काळाच्या ओघातही अधिकच सुसंगत ठरत असून, त्यांचे कीर्तन, नामस्मरण आणि उपदेश पिढ्या न पिढ्या समाजाला मार्गदर्शन करत राहतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या ५० व्या  सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, गडाचे महंत विठ्ठल महाराज, आमदार धनंजय मुंडे, सुरेश धस, मोनिका राजळे, माजी आमदार जयदत्त क्षीरसागर, भीमराव धोंडे, विक्रमानंद शास्त्री, स्वामी विश्वेश्वरानंदजी महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, श्री संत वामनभाऊ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी मी येथे आलो आहे. हे निमंत्रण मुख्यमंत्र्याला नसून, श्री संत वामनभाऊ महाराजांच्या एका भक्ताला आणि गहिनीनाथ गडाच्या सेवकाला विठ्ठल महाराजांनी दिलेले आहे, या भावनेतून मी येथे उपस्थित आहे.

नाथ परंपरेतील महान संत आणि शंकराचा अवतार मानले जाणारे श्री संत वामनभाऊ महाराज हे समाजाला दिशा देणारे सद्गुरु होते. दऱ्या-खोऱ्यांतून प्रवास करत त्यांनी भागवत पंथाचा प्रचार केला आणि समाजात एकोप्याचा संदेश दिला. मन शुद्ध असेल तर आचरण शुद्ध होते हा विचार त्यांनी समाजमनात रुजवला. त्यांच्या उपदेशामुळे चोरसुद्धा चोरी सोडून माळकरी झाले, ही त्यांची अलौकिक किमया होती, असे त्यांनी सांगितले.

श्री संत वामनभाऊ महाराजांना वाचासिद्धी होती, असे सांगितले जाते. त्यांच्या कीर्तनातून आणि विचारातून समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत अध्यात्म पोहोचले. कितीही पिढ्या बदलल्या तरी त्यांचे कीर्तन, नामस्मरण आणि उपदेश आजही तितकेच महत्त्वाचे आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

प्रसाद वितरणाची परंपरा हे श्री संत वामनभाऊ महाराजांचे मोठे वैशिष्ट्य असून, जिथे-जिथे सप्ताह होतो तिथे भाविकांसाठी पोटभर जेवणाची व्यवस्था केली जाते. पुढील सप्ताहासाठी विविध गावांतून मोठ्या प्रमाणावर मागणी असणे ही श्री संत वामनभाऊ महाराजांच्या कृपेची साक्ष असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी शासनाच्या योजनेअंतर्गत विविध कामे हाती घेण्यात आली असून ती टप्प्याटप्प्याने पूर्ण होत आहेत.

पंढरपूर येथे आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, पालखी मार्गाच्या विकासासाठीही लवकरच काम करण्यात येईल, असे आश्वासन देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर गहिनीनाथ गडाचा एक अनुयायी म्हणून येथील सर्व विकासकामांची जबाबदारी लोकप्रतिनिधींसह मिळून पार पाडली जाईल. दरवर्षी संधी मिळेल तेव्हा गहिनीनाथ गडावर येऊन श्री संत वामनभाऊ महाराजांचा आशीर्वाद घेत राहीन, असे मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, श्री संत वामनभाऊ महाराजांनी कठीण काळात माणसाला माणूस बनवण्याचे संस्कार समाजाला दिले. सत्य, एकोपे आणि सेवाभावाचे हे संस्कार आजही महाराष्ट्रभर जिवंत आहेत. कष्टकरी, गरीब आणि वंचित समाज श्री संत वामनभाऊ महाराजांचे विचार विसरलेला नाही.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून गहिनीनाथ गडाच्या विकासाला भव्य स्वरूप मिळत असून, हे कार्य भाविकांच्या श्रद्धेला साजेसे ठरत आहे. सामान्य माणसाच्या श्रद्धास्थानांच्या विकासासाठी केलेले हे कार्य निश्चितच लोकांचा आशीर्वाद मिळवून देणारे आहे असा उल्लेख त्यांनी केला. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet.