अमरावती, (प्रतिनिधी) ११ जानेवारी - हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अमरावती जिल्ह्याच्या पट्ट्यात ९ जानेवारीपासून ते १३ जानेवारी २०२६ या पाच दिवसांच्या कालावधीत महामार्गावरील वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (MSRDC) 'हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम' अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
नेमका बदल काय आणि कोठे?
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर या तीन तालुक्यांच्या हद्दीतून जाणाऱ्या कि.मी. ९०+५०० ते कि.मी. १५०+३०० या दरम्यान हे तांत्रिक काम केले जाणार आहे. महामार्गावर माहिती देणारे फलक आणि कॅमेरे बसवण्यासाठी लागणारे लोखंडी खांब (गॅन्ट्री) उभारण्यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे.
प्रवाशांचा असा होईल खोळंबा:
हे काम एकूण १० टप्प्यांत पूर्ण केले जाणार आहे.
प्रत्येक टप्प्यात काम सुरू असताना संबंधित वाहिनीवरील (Lane) वाहतूक ४५ ते ६० मिनिटांसाठी पूर्णतः बंद ठेवली जाईल.
गॅन्ट्री उभारण्याचे काम पूर्ण होताच त्या वाहिनीवरील वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात येईल.
प्रवाशांना प्रशासनाचे आवाहन
या तांत्रिक कामामुळे प्रवाशांचा काही काळ खोळंबा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी वेळेचे नियोजन करावे आणि महामार्गावर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षक तसेच कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन रस्ते विकास महामंडळाने केले आहे. हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टममुळे भविष्यात महामार्गावरील अपघात रोखण्यास आणि सुरक्षित प्रवासास मदत होणार आहे.