नाशिक, (प्रतिनिधी) दि.११ जानेवारी २०२६ – वेगाने विकसित होणाऱ्या नाशिकला हरित आणि सुंदर करण्याबरोबरच देशातील सर्वात स्वच्छ बनविणार तसेच नाशिक शहर खड्डे मुक्त करणार असल्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शिवसेना - रिपब्लिकन सेना युतीने केला आहे. युतीच्या वतीने नाशिककरांसाठीचा वचननामा आज सादर करण्यात आला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेला कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शिवसेनेचे अनिल ढिकले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गोरख बोडके, रवी भोये यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी रिपब्लिकन सेना युतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
नाशिक शहरात वृक्षतोड न करता विकास केला जाईल असा पुनरूच्चार युतीच्या नेत्यांनी केला आहे. नदी प्रदूषणाचा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी जाहीरनाम्यात ठोस उपाययोजना मांडण्यात आल्या आहेत. गोदावरीच्या उपनद्यांना नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे या नद्यांचे 'अक्विफर मॅपिंग' करून त्यांना बारमाही वाहते केले जाईल. सातपूर औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सीईटीपी यंत्रणा तातडीने कार्यान्वित करून गोदावरी आणि नंदिनीला प्रदूषणमुक्त केले जाईल. गोदावरी आणि तिच्या उपनद्यांच्या किनारी बांबूची लागवड करून नैसर्गिक तटबंदी निर्माण केली जाईल, असेही युतीच्या नेत्यांनी सांगितले.
सद्यस्थितीत मध्य प्रदेशातील इंदूर हे देशातील पहिल्या क्रमांकाचे स्वच्छ शहर आहे. मात्र, आगामी काळात नाशिकला देशातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर बनविले जाईल. त्यासाठी घंटागाड्यांची संख्या वाढवून कचऱ्याचे संकलन केले जाईल. शास्त्रोक्त विलगीकरण करून विल्होळी येथील कचरा डेपोवर 'बायोडिझेल प्रकल्प' सुरू केला जाईल. रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी स्वयंचलित यंत्रांचा वापर आणि शहरात ठिकठिकाणी मोबाईल स्वच्छतागृहांची निर्मिती केली जाईल. मनपाच्या मोकळ्या भूखंडांवर, उद्यानांत आणि जलकुंभांच्या परिसरात देशी वृक्षांची लागवड करून त्यांचे दीर्घकालीन जतन केले जाईल, असा निर्धार युतीच्या वचननामा मध्ये करण्यात आला आहे.
नाशिक शहरातील रस्त्यांवर सध्या खुप खड्डे आहेत. त्यामुळे रस्त्यांचा दर्जा सुधारणे, महापालिकेचा कारभार ऑनलाईन आणि पारदर्शक करणे, फाळके स्मारकाचे रूपडे बदलणे, तारांगणाला पुनरुज्जिवीत करणे, शहरात बस आणि रिक्षा सेवेचा दर्जा वाढविणे, वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविणे, झोपडपट्टीमुक्त शहर करणे, नाशिकला आयटी पार्क कार्यान्वित करणे आदी बाबींचा वचननामा मध्ये समावेश करण्यात आला आहे.
सिंहस्थासाठी हे करणार
नाशिक विमानतळावर दुसरी धावपट्टी, टर्मिनल २, इमिग्रेशन चेक पोस्ट, आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करणे. नाशिक–त्र्यंबकेश्वर रिलिजियस कॉरिडॉर मध्ये हवाई वाहतूक प्रस्तावित करणे, नाशिक शहरासह जिल्ह्यात मोबाईल टॉवर्स 5G करणे, एसटीच्या ५०० बसेस उपलब्ध करणे, डबल डेकर ५० ई-बस प्रस्तावित करून नाशिक कुंभमेळा २०२७ मध्ये सार्वजनिक वाहतूक प्रोत्साहित करणे, त्र्यंबकेश्वरला डॉपलर वेदर रडार उभारणे, नाशिकरोड रेल्वे स्टेशनचा विकास, मनमाड-कसारा तिसरा व चौथा रेल्वे मार्ग, २०० खाटांचे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय आदी कामे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केली जाणार असल्याचे वचननामा मध्ये नमूद करण्यात आले आहे.
नाशिक शहराचा विस्तार झपाट्याने वाढतो आहे. ओझऱ, दिंडोरी,त्र्यंबकेश्वर यासारखी शहरे आता नाशिकच्या विस्तारात येत आहेत. त्यामुळे पुढील २५ वर्षांचा विचार करूनच विकासाचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आम्ही वचननामा तयार केला आहे. तसेच, नाशिक हे हरितच रहावे यावर आमचा भर आहे.
- नरहरी झिरवाळ,मंत्री,अन्न व औषध प्रशासन,महाराष्ट्र राज्य
‘हरित नाशिक,सुंदर नाशिक’चा संकल्प आम्ही केला आहे. तपोवन ही नाशिकची खरी ओळख ती कायम ठेवली जाईल. झाडे न तोडता शहराचा परिपूर्ण विकास साधला जाईल. शाश्वत विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. बांबू लागवडी करून महापालिकेचे उत्पन्नही वाढविले जाईल.
-माजी खासदार समीर भुजबळ,स्टार प्रचारक,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
नाशिकची खरी ओळख असलेल्या तपोवन परिसराचे अस्तित्व कायमस्वरूपी टिकवून त्याचे संवर्धन करण्याला राष्ट्रवादी काँग्रेसने प्राधान्य दिले आहे.निसर्ग आणि आधुनिक विकास यांचा समतोल साधणारा हा जाहीरनामा नाशिककरांच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.
-माजी खासदार हेमंत गोडसे,शिवसेना
वचननामाची ठळक वैशिष्ट्ये
-शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता किकवी धरण
-महापालिकेत पर्यटन विकास सेल सुरू करणार
-द्वारका येथे ५०० बेडचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल साकारणार
-महापालिका शाळेत ई लर्निंग आणि डिजीटल क्लासरूम
-छत्रपती संभाजी स्टेडिअम येथे क्रीडा प्रशिक्षण केंद्र
-शहराच्या एण्ट्री पॉईण्टवर कॉमन सर्व्हिस सेंटर
-सीएनजी पेट्रोल पंप आणि इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स
-इंडस्ट्रिअल एक्झिबिशन सेंटर
-महिला बचत गटांसाठी विशेष मॉल
-शहराच्या सर्व भागात प्रसाधनगृहे
-पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवाच्या धर्तीवर नाशिक फेस्टिव्हल
-सहाही विभागात भाजपाला मॉल